खळद येथे नदी संरक्षण भिंतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे: उपसंपादक प्रा संदीप टिळेकर :
खळद येथे नदीसंरक्षण भिंतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर*
पुरंदर तालुक्यातील मौजे खळद येथे कऱ्हा नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योनेतून ५ कोटी रुपये निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रशासकीय मान्यता आदेश नुकतेच जारी केले आहेत. आमदार विजय शिवतारे, पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर यांनी या कामासाठी बराच काळ पाठपुरावा केला होता.
कऱ्हा नदीला पूर आल्यास परिसरातील शाळा, आरोग्य केंद्र आणि वस्त्या व नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्याच्या उद्देशाने पूर नियंत्रणांतर्गत ही अत्यंत महत्त्वाची उपाययोजना करण्यात आली आहे. आमदार शिवतारे यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांनी या कामाचा तांत्रिक मान्यतेसह प्रस्ताव सादर केला होता. याबाबत आ. शिवतारे म्हणाले, पुढील १५ दिवसांत या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. साधारणपणे दोन महिन्यांच्या आत प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश निर्गमित करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. सर्व कामे विहित मुदतीत व उच्च गुणवत्तेने पूर्ण करण्याची जबाबदारी या यंत्रणेला दिलेली आहे.
स्थानिक पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर म्हणाले, सन २०१९ साली आलेल्या महापूरामध्ये खळद गावाला मोठा तडाखा बसला होता. यात नदीपात्र रुंद होऊन ते जवळजवळ गावठाणाला मिळाले आहे. त्यामुळे या भागातील शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि लोक वस्तीला धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आलेली असून आमदार शिवतारे यांच्या प्रयत्नातून या कामाला मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थाना मोठा दिलासा मिळाला आहे.






