सासवड वाघिरे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
वाघीरे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय, सासवड येथील मराठी विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, सोपान नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. नानासाहेब पवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके होते.
डॉ. प्रभाकर देसाई यांनी मराठी भाषा आणि तिच्या अभिजातते संदर्भात आपले विचार व्यक्त करताना, मराठीच्या टिकाव आणि वृद्धीसाठी आवश्यक घटकांवर प्रकाश टाकला. तसेच, मराठी भाषेचा सार्वजनिक आणि शासकीय वापर वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित
केली. मराठी साहित्य आणि लोकसंस्कृतीचे वैविध्य स्पष्ट करताना, मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री. रावसाहेब पवार यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी अध्यक्ष मनोगत सांगितले की, मराठी भाषा टिकवण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मराठीत संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच, शाळांमध्ये सक्तीने मराठी शिकवली जावी
आणि प्रशासनाने मराठी भाषेचा सरकारी कामकाजात अधिकाधिक वापर करावा. भविष्यातील पिढ्यांसाठी मराठीचा ठेवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात डॉ. संदीप वाकडे आणि डॉ. किरण गाढवे लिखित “गीतमाला : आस्वाद व आकलन” या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मराठी विभागातील वाड्मय मंडळाच्या ‘आमची लेखणी’ या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले
तसेच, वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी या उद्देशाने अक्षरवाङ्मय प्रकाशनतर्फे दिला जाणारा ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ अमोल राम डायरे यांना प्रदान करण्यात आला. तसेच महाविद्यालयात प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांनी मराठी विभाग व अक्षरवाङ्मय प्रकाशनतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविले होते.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सुभाष वाव्हळ, डॉ. संजय झगडे , मा. अभिजित जगताप, युसुफ सय्यद, इंदिरा पवार, डॉ. सुभाष नप्ते, डॉ. नितीन लगड, डॉ. तुषार घोरपडे, डॉ. आनंदा सारंगे,
डॉ. विजय पुणेकर, डॉ. रोहिदास ढाकणे, डॉ. अनिल झोळ, डॉ. दीपक उजागरे, डॉ. सुजाता निकम, प्रा. सुनिता कोलते, प्रा. समीर कुंभारकर, प्रा. कपिल कांबळे, प्रा. दीपक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. साक्षी जगताप आणि प्राजक्ता भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन युसुफ सय्यद यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. किरण गाढवे आणि डॉ. नूतन लोणकर यांनी जबाबदारी पार पाडली.
या सोहळ्यास मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणारे अनेक मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






