महाराष्ट्र

कार्यकारी अभियंता ‘अंकुश पालवे’ यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
उपसंपादक सह्याद्री माझा प्रा संदीप टिळेकर :
कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार

उत्कृष्ट रस्ते, पूल, इमारती आणि विविध विकासकामांतील उल्लेखनीय योगदानाची शासनाकडून दखल

अहिल्यानगर : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या अभियंता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा कार्यकारी अभियंता अंकुश अशोकराव पालवे यांना सन २०२५-२६ चा मानाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

अंकुश पालवे यांनी गेल्या १८ वर्षांच्या शासकीय सेवेत रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच विविध पायाभूत विकासकामांच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान दिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्तेला प्राधान्य, अचूक नियोजन, प्रशासकीय समन्वय आणि निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत कामे पूर्ण करण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे त्यांच्या कार्याची शासनाने विशेष दखल घेतली आहे.

अहिल्यानगर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना जवळपास आठ वर्षांपासून रखडलेले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम विशेष प्रयत्नांतून अवघ्या एका वर्षात पूर्ण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच एडीबी अंतर्गत सिद्धटेक–कोर्टी रस्त्याच्या कामाला आवश्यक परवानग्या मिळवून देत प्रत्यक्ष कामाला गती देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. या रस्त्याला राज्यातील ‘उत्कृष्ट रस्ता’ म्हणून गौरविण्यात आले आहे.

केवळ दोन वर्षांच्या कालावधीत नियोजन, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी रुपयांच्या शासकीय इमारतींची अनेक कामे पूर्णत्वास नेण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीआयपी शासकीय विश्रामगृह, मुख्य न्यायालयीन निवासस्थाने, महसूल भवन, पाथर्डी तहसील कार्यालय, कर्जत व जामखेड येथील शासकीय रुग्णालये व विश्रामगृहे, पारनेर तालुका न्यायालयाची इमारत तसेच हिवरे बाजार येथील प्रशिक्षण संकुलाचा दुसरा टप्पा या कामांमध्ये त्यांनी प्रभावी योगदान दिले.

कोविड-१९ महामारीच्या काळात १०० खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाच्या उभारणीतही त्यांनी विशेष भूमिका बजावली.

कोंभळी–कर्जत–राशीन मार्गावरील अनेक वर्षांपासून रखडलेली आणि विविध कारणांमुळे अडचणीत आलेली कामे स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाशी समन्वय साधून मार्गी लावण्यात पालवे यांनी पुढाकार घेतला. सुमारे सात वर्षांपासून रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यात त्यांचा सहभाग राहिला. याशिवाय शेवगाव–पैठण, शेवगाव–मिरी–नगर या मार्गांसह विविध रस्ते विकासकामांमध्ये त्यांनी योगदान दिले.

तास आंग्रेवाडी येथील मुळा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम अवघ्या १८ महिन्यांत बचतीसह पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे दोन तालुक्यांतील नागरिकांच्या प्रवासातील सुमारे ४० किलोमीटर अंतराची बचत झाली. निमगाव गांगर्डा येथील सीना नदीवरील पूल, सामनगाव येथील ढोरा नदीवरील पूल आणि अन्य महत्त्वाच्या पुलांच्या कामांमध्येही त्यांचा सहभाग राहिला.

राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील दुर्गम भागातील रखडलेले ग्रामीण रुग्णालयाचे काम विशेष प्रयत्नांनी दोन वर्षांत पूर्ण करून ते नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले. तर नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असताना आदिवासीबहुल आणि आकांक्षित जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-पाड्यांना जोडण्यासाठी ‘साकव’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली. अवघ्या सहा महिन्यांत नऊ साकवांचे बांधकाम पूर्ण करून स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय दूर करण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यातील सावळदे–रनाळा–शनी मांडळ या एडीबी अंतर्गत महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पाचे काम सुरुवातीपासून पुढे नेत अंतिम टप्प्यात आणण्यातही त्यांचा सहभाग राहिला. सध्याच्या कार्यकाळात केवळ एका वर्षात दहा मोठ्या इमारतींची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यापैकी पाच इमारती २६ जानेवारी २०२६ रोजी एकाच दिवशी हस्तांतरित करण्यात आल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ चोंडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, मंत्री आणि अन्य मान्यवरांच्या दौऱ्यांचे नियोजन व समन्वय साधण्यातही त्यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच सन २०२३ मधील नाशिक विभागाच्या ‘नमो महास्वयंरोजगार मेळाव्याचे’ नियोजन आणि सात्रळ येथील विश्वविक्रमात नोंद झालेल्या श्री गंगागिरी महाराज सप्ताहाच्या आयोजनातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सन २०१४ पासून लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात मुख्य निवडणूक निरीक्षकांचे संपर्कप्रमुख व समन्वय अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. पंतप्रधानांसह विविध व्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यांचे नियोजन आणि विभागीय कामकाजात अचूक समन्वय राखण्यात त्यांचा सहभाग राहिला.

सार्वजनिक बांधकाम विभागातील तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक दोनच्या कार्यालयाला शासनाचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यातही त्यांचे योगदान राहिले आहे. विभागीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन, सहभाग आणि शासनाच्या विविध विकासकामांमध्येही त्यांनी सातत्याने योगदान दिले.

अंकुश पालवे यांच्यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील उपअभियंता प्रल्हाद अनंतराव पाठक यांनाही ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तसेच विभागीय आरेखक संदीप कोंडाजी चिने यांचा ‘गुणवंत तांत्रिक कर्मचारी’ म्हणून गौरव होत आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी अंकुश पालवे यांच्यासोबत विविध विकासकामांमध्ये काम केले आहे.

प्रल्हाद पाठक यांनी तिसगाव–शेवगाव–पैठण, पांढरीपूल–मिरी–शेवगाव–बोधेगाव, नेवासा–शेवगाव या रस्त्यांसह शेवगाव न्यायालय इमारत, सामनगाव येथील ढोरा नदीवरील पूल आणि शेवगाव बाह्यवळण रस्त्याच्या रेखांकनासह अनेक विकासकामांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.

लोकप्रतिनिधींचे व्हिजन आणि शासनाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत राहून, नियमांच्या चौकटीत गुणवत्ता आणि गती कायम ठेवत काम पूर्ण करणे हेच आपल्या कार्याचे अंतिम उद्दिष्ट आहे, अशी भूमिका अंकुश पालवे यांनी आपल्या कार्यातून सातत्याने जपली आहे. कामाच्या निमित्ताने आलेल्या नाराजीला व्यक्तिगत स्वरूप न देता कर्तव्याला प्राधान्य देणे, ही त्यांची कार्यशैली असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगितले जाते.

मर्यादित मनुष्यबळ, उपलब्ध साधनसामग्री, जनसामान्यांच्या वाढत्या अपेक्षा आणि लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वयाची गरज अशा विविध आव्हानांमध्येही वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधत त्यांनी काम केले. त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि सर्जनशील कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या सन्मानाचे श्रेय मार्गदर्शक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कुटुंबीय, मित्र, सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना देताना, हा पुरस्कार आपल्या एकट्याचा नसून संपूर्ण टीमने केलेल्या एकत्रित कार्याचा गौरव आहे, अशी भावना अंकुश पालवे यांनी व्यक्त केली.

कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असताना अहिल्यानगर आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांतून ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले कार्यकारी अभियंता म्हणून अंकुश पालवे यांचा उल्लेख होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे अहिल्यानगर तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या पुरस्काराबद्दल सामाजिक, प्रशासकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातून अंकुश पालवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Translate »
error: Content is protected !!