पुणे

जवळार्जुन मध्ये डेंगू चे दोन रुग्ण आढळले ;आरोग्य विभागाचा कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
पुरंदर प्रतिनिधी नवनाथ राणे::

जवळार्जुनमध्ये डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले; आरोग्य विभागाचा ‘कोरडा दिवस’ पाळण्याचा निर्णय

जवळार्जुन, ता. पुरंदर – जवळार्जुन ग्रामपंचायतीच्या हद्दीत डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीची तातडीने दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीस डेंग्यू प्रतिबंधक औषधांचा पुरवठा केला आहे. मात्र औषध फवारणीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे ग्रामसेवकांनी दूरध्वनीद्वारे कळविले.

दिनांक 5 जुलै 2025 रोजी, शनिवारी आरोग्य विभागाच्या पथकाने गावात भेट दिली. यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाचे कीटक संहारक इनामदार साहेब, तालुका विस्तार अधिकारी प्रकाश चौरे, आरोग्य सहाय्यक चंद्रकांत कुदळे, आरोग्य सेवक भिन्नर साहेब, रोटे साहेब तसेच आशा कार्यकर्त्या कारंडे, पवार, शेंडगे व सुतार मॅडम उपस्थित होत्या.

गावातील सरपंच अजिंक्य भैय्या टेकवडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “आरोग्य अधिकाऱ्यांना फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी व औषध फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. योग्य ती कारवाई लवकर व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे.”

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण अण्णा पोटे, दिलीप पोटे व नवनाथ टेकवडे हेही उपस्थित होते. तालुका विस्तार अधिकारी प्रकाश चौरे यांनी डेंग्यूच्या प्रादुर्भावासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, आरोग्य विभागाने ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले असून नागरिकांनी घरात व आजूबाजूच्या परिसरात पाणी साठवणूक टाळावी, नियमित स्वच्छता राखावी, व डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Translate »
error: Content is protected !!