अविष्कार स्पर्धा 2026 मध्ये साबळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
उपसंपादक सह्याद्री माझा – प्रा संदीप टिळेकर ::
आविष्कार स्पर्धा २०२६ मध्ये साबळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सासवड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे आविष्कार स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेमध्ये बी. फार्मसी विभागातील ३८ पोस्टर्स, एम. फार्मसी विभागातील १० पोस्टर्स तसेच डिप्लोमा विभागातील १३ पोस्टर्स, असे एकूण ६१ संशोधनपर पोस्टर्स विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच समाजोपयोगी संशोधनाच्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. सृष्टी जाधव यांनी केले. संशोधन समन्वयक डॉ. स्मिता पवार यांनी प्रास्ताविकातून आविष्कार स्पर्धेचे उद्दिष्ट व विद्यार्थ्यांसाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना आविष्कार पोस्टर सादरीकरणाबाबत मार्गदर्शन करताना संशोधनातील नाविन्यता, विषयाची मांडणी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रभावी सादरीकरण कौशल्य याविषयी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संशोधनामध्ये नाविन्यता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजोपयोगी संशोधन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य, पीडीईएचे वाघिरे कॉलेज, सासवड तसेच सदस्य, मॅनेजमेंट कौन्सिल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोस्टर परीक्षणासाठी डॉ. मीरा सी. सिंग, प्रोफेसर, सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव (बु.), पुणे तसेच प्रोफेसर विषाखा गनवीर, वाघिरे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सासवड यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. डिप्लोमा विभागातील पोस्टर्सचे परीक्षण प्रा. डॉ. जयश्री जगताप आणि प्राध्यापक डॉ. अमोल काळे यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संकल्पना मांडण्यासाठी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्या संशोधनकार्याला व्यासपीठ मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली.
कार्यक्रमाचे नियोजन संशोधन समन्वयक डॉ. स्मिता पवार आणि प्रा. दिपाली जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. पूजा पेटकर यांनी केले.






