शैक्षणिक

हीलिंग अँड फाउंडेशनच्या ” छात्र स्वास्थ्य प्रबोधनी “तून विद्यार्थ्यांना आरोग्यजागृतीचे धडे


मुख्य संपादन सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
उपसंपादक नवनाथ राणे:
हीलिंग हॅन्ड्स फाऊंडेशनच्या ‘छात्र स्वास्थ्य प्रबोधिनी’तून विद्यार्थ्यांना आरोग्यजागृतीचे धडे

पुरंदर, दि. ११ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच आरोग्यदायी सवयी, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हीलिंग हॅन्ड्स फाऊंडेशनच्या वतीने ‘छात्र स्वास्थ्य प्रबोधिनी’ हा आरोग्यजागृतीपर उपक्रम जवळार्जुन (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा सुमारे १०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयींपासून सुरू झालेल्या या संवादात्मक सत्रामध्ये विद्यार्थ्यांशी आहाराच्या सवयी, जीवनशैली, स्वच्छता आणि आरोग्य याबाबत सहज व मोकळेपणाने संवाद साधण्यात आला. तसेच गट हेल्थ आणि अ‍ॅनोरेक्टल हेल्थ यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक विषयांवरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

लहान वयातच विद्यार्थ्यांना आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याची माहिती मिळावी आणि त्यांनी आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात, या उद्देशाने हीलिंग हॅन्ड्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अश्विन पोर्वाल आणि संस्थापक सचिव डॉ. स्नेहल पोर्वाल यांनी ‘छात्र स्वास्थ्य प्रबोधिनी’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यविषयक योग्य आणि उपयुक्त माहिती पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.

या सत्राचे मार्गदर्शन तेजश्री खलाटे, समुपदेशक यांनी केले. तर अनिता सैद, शिबिर व्यवस्थापक यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली. यावेळी हीलिंग हॅन्ड्स फाऊंडेशनच्या टीमनेही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तरे दिली.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न विचारले.

लहान वयात रुजलेली आरोग्यजाणीव ही निरोगी आयुष्याची मजबूत पायाभरणी ठरते, याच विचारातून ‘छात्र स्वास्थ्य प्रबोधिनी’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


Translate »
error: Content is protected !!