ब्रेकिंग न्यूज

किडनी प्रत्यारोपणानंतर आ विजय शिवतारे पुन्हा मैदानात ; दिवे घाटापासून सासवड पर्यंत भव्य स्वागताची तयारी,कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
आमदार विजय शिवतारे यांचे सहा महिन्यांनंतर पुरंदर तालुक्यात पुनरागमन!
## दिवे घाटापासून सासवडपर्यंत भव्य स्वागताची तयारी; कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

**सासवड | सह्याद्री माझा न्यूज नेटवर्क**

तब्बल सहा महिन्यांच्या वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीनंतर पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांचे ३ नोव्हेंबर रोजी तालुक्यात प्रथमच पुनरागमन होत आहे. यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर आमदार शिवतारे पुन्हा जनसेवेसाठी सक्रिय होत असल्याने पुरंदर-हवेलीतील नागरिक, शिवसैनिक आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार विजय शिवतारे यांच्यावर गेल्या सहा महिन्यांत मुंबई येथे उपचार आणि किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची कन्या डॉ. ममता विजय शिवतारे-लांडे यांनी स्वतःची किडनी वडिलांना दान करून त्यांना नवजीवन दिले. हा भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास पूर्ण करून आमदार शिवतारे आता पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

वैद्यकीय उपचारांमुळे ते तालुक्यापासून दूर असले, तरी पुरंदरमधील विकासकामे, शासकीय बैठका आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी ऑनलाइन माध्यमातून सातत्याने लक्ष ठेवले होते.

आमदार शिवतारे यांच्या पुनरागमनानिमित्त हवेलीपासून पुरंदर तालुक्याच्या प्रवेशद्वार असलेल्या दिवे घाटात, तसेच सासवड शहर आणि परिसरात भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते नागरिक, शेतकरी, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. स्वागत सोहळ्यास शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

### शेतकरी, माता आणि निराधार व्यक्तींना मदतीचा आधार

आमदार विजय शिवतारे यांच्या आगमनानिमित्त सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप, स्तनदा मातांना संतुलित आहाराचे वाटप, तसेच गरीब आणि निराधार व्यक्तींना दिवाळी शिधा वाटप करण्यात येणार आहे. ही माहिती पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर यांनी दिली.

### “पुरंदरच्या जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा जनसेवेत!”

“माझी मुलगी डॉ. ममता हिने मला दिलेल्या नवजीवनामुळे आणि पुरंदरच्या जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने जनतेच्या सेवेत रुजू होत आहे. पुरंदरचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे कल्याण हेच माझे ध्येय असून, पुन्हा एकदा प्रत्यक्ष जनसेवेत येताना मला अत्यंत आनंद होत आहे,” असे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले.

आमदार शिवतारे यांच्या पुनरागमनामुळे पुरंदर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींना पुन्हा वेग येण्याची शक्यता असून, त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.


Translate »
error: Content is protected !!