दिवे आरटीओच्या ऑटोमेटेड ट्रॅक आणि रोड सेफ्टी इन्स्टिट्युटचे काम वेगात
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
*दिवे आरटीओच्या ऑटोमेटेड ट्रॅक आणि रोड सेफ्टी इन्स्टिट्युटचे काम वेगात*
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी व कामाचा आढावा
राज्याच्या परिवहन व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देत सामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा आणि परिवहन विभागाच्या सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे परिवहनमंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी दिली. मौजे दिवे (ता. पुरंदर) येथे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने प्रस्तावित असलेल्या अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक (ADTT) स्थळाची व नियोजित रोड सेफ्टी इन्स्टिट्युटची त्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.
या प्रसंगी उपस्थित परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी सुरू असलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. जनतेच्या हक्काच्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण करून त्या नागरिकांच्या सेवेत दाखल कराव्यात, या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याच्या कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक पाहणी दौऱ्यावर आले असता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल म्हस्के, पुरंदर पंचायत समितीचे सदस्य माणिक निंबाळकर, तालुकाप्रमुख उमेश गायकवाड, राजुशेठ झेंडे, विशाल रावडे, गणेश मुळीक आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. पाहणी दौरा संपन्न झाल्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी सासवड आणि जेजुरी बस स्थानकाशी संबंधित असलेल्या विविध समस्या, प्रवाशांची गैरसोय आणि पायाभूत सुविधांच्या अभावाबाबत परिवहनमंत्र्यांना सविस्तर अवगत केले. या स्थानिक व महत्त्वाच्या समस्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नामदार सरनाईक यांनी या वेळी दिले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी परिवहन विभागाचे उच्चपदस्थ अधिकारीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चाचणी केंद्राचे आणि इन्स्टिट्युटचे वैशिष्ट्य* :
• *अत्याधुनिक व पारदर्शक चाचणी* : ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक (ADTT) मुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) माध्यमातून वाहनचालकांना ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) मिळवण्यासाठी एक पूर्णपणे अत्याधुनिक, संगणक आणि सेन्सर आधारित चाचणी केंद्र उपलब्ध होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढेल.
• *आधुनिक प्रशिक्षण* : नियोजित रोड सेफ्टी इन्स्टिट्युटच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा, वाहतूक इंजीनियरिंग आणि चालक प्रशिक्षणाचे धडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दिले जाणार आहेत. ज्यामुळे भविष्यातील रस्ते अपघात कमी करण्यास मदत होईल.






