जवळार्जुन मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; एका रात्रीत चार घरफोड्या, माजी सैनिकाची सर्व्हिस रिवाल्वर व बारा जिवंत काडतूसे चोरीला !
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
उपसंपादक नवनाथ राणे:
जवळार्जुनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार घरफोड्या, माजी सैनिकाची सर्व्हिस रिव्हॉल्वर व १२ जिवंत काडतुसे चोरीला
पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत ३० जुलै २०२६ च्या मध्यरात्री चार ठिकाणी घरफोड्या केल्या. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये एका माजी सैनिकाची सर्व्हिस रिव्हॉल्वर आणि १२ जिवंत काडतुसे असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फौजी नवनाथ सुरेश पोटे, रमेश ज्ञानोबा पोटे, रायचंद पोटे आणि सुरेश टेकवडे यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. नवनाथ पोटे यांच्या घरातून सर्व्हिस रिव्हॉल्वर व १२ लाईव्ह राऊंड चोरीला गेले. सुरेश टेकवडे यांच्या घरातून दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, तर रमेश पोटे यांच्या टपरीतून रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य चोरीला गेले.
गेल्या चार वर्षांपासून जवळार्जुन गावात घरफोड्या, विहिरीवरील केबल आणि मोटार चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच आज सकाळी ७ वाजता रवींद्र पाटील, पीएसआय सर्जेराव पुजारी, बीट अंमलदार संदीप भापकर, गव्हाणे, कसेकर मॅडम आणि पोलीस पाटील अविनाश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून माहिती संकलित केली. तसेच पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकानेही घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी गावातील नऊ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ग्राम सुरक्षा दलाची यादी तयार करण्याच्या सूचना पोलीस पाटलांना देण्यात आल्या असून, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले आहे.
पोलिसांनी लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल, असा विश्वास व्यक्त केला असून, ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. तसेच दररोज रात्री पोलीस गस्त वाढविण्यात येणार असून, विविध ठिकाणी नाकाबंदी आणि संशयितांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. जेजुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे






