पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत बनावट पत्र वायरल : अज्ञात व्यक्ती विरोधात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
पुरंदर प्रतिनिधी समीर भिंगारदिवे :
पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत बनावट पत्र व्हायरल; अज्ञात व्यक्तीविरोधात सासवड पोलिसांत गुन्हा दाखल
सासवड : छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पाबाबत बनावट पत्र तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संतोष हरी बरगे (वय 37, रा. तिनेवाडी रोड, बच्चेपाटील कॉलनी, राजगुरूनगर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 12 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उदाचीवाडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव, एकहतपूर व मुंजवडी परिसरातील शेतकरी व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोणीतरी अज्ञात इसमाने कार्यालयाच्या नावाचे बनावट लेटरपॅड तयार करून खोटी माहिती प्रसारित केली.
सदर बनावट पत्रामध्ये छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पासाठी प्रस्तावित जागा तांत्रिक तपासणीनंतर अयोग्य असल्याचा मजकूर तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे संबंधित गावांतील नागरिक व शेतकऱ्यांच्या मनात भूसंपादन प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 215/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 336(2), 336(4) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शेगर करीत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक कुमार कदम कार्यरत आहेत.






