आस्करवाडीतील कसोल कॅफेवर छापा ; अवैध हुक्का बार उध्वस्त, 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
आस्करवाडीतील कसोल कॅफेवर छापा; अवैध हुक्का बार उध्वस्त, 33 हजारांचा मुद्देमाल जप्त
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील कसोल कॅफे हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का बारवर सासवड पोलिसांनी कारवाई करत 33 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 393/2026 अन्वये पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश किवळे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात रोहित विष्णू बनसोडे (वय 26, रा. पुणे) व अंकीत कुषवाह (वय 19, रा. आस्करवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 2.50 वाजण्याच्या सुमारास आस्करवाडी येथील कसोल कॅफे हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी संबंधित आरोपी ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का उपलब्ध करून देत हुक्का बार चालवत असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान 5 हुक्का पॉट, विविध कंपनींचे तंबाखुजन्य फ्लेवर, 5 चिलीम, फिल्टर पाईपचे पॅकेट, 5 रबरी पाईप तसेच लोखंडी चाळण असा एकूण 33 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार हाके करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.






