सासवडमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवडमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सासवड शहरातील खंडोबा नगर झोपडपट्टी परिसरात जुन्या आर्थिक वादातून एका 23 वर्षीय तरुणावर कोयता व दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सासवड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर बबलू नाथू (वय 23, रा. खंडोबा नगर झोपडपट्टी, सासवड) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना 28 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 8.40 वाजण्याच्या सुमारास खंडोबा नगर येथील विराज किराणा स्टोअरसमोरील रस्त्यावर घडली.
तक्रारीनुसार, आरोपी पिंकी पांडुरंग पवार हिने फिर्यादीकडे कोणतेही पैसे येणे नसतानाही उसने घेतलेले पैसे परत देण्याची मागणी करत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर महादेव खुडे व नंदिनी रोहन पवार यांनी दगडाने डोक्यावर व पोटावर मारहाण केली.
दरम्यान, रोहन पांडुरंग पवार याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने बचावासाठी डावा हात पुढे केल्याने कोयत्याचा वार हाताच्या बोटांवर व तळव्यावर बसून गंभीर दुखापत झाली. तसेच सुरज विटकर (पूर्ण नाव माहित नाही) यानेही फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या कानामागील भागावर वार करून गंभीर जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जखमीवर जनहितार्थ हॉस्पिटल, सासवड येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर सागर नाथू यांच्या फिर्यादीवरून पिंकी पांडुरंग पवार, रोहन पांडुरंग पवार, महादेव खुडे, नंदिनी रोहन पवार आणि सुरज विटकर (पूर्ण नाव माहित नाही) या पाच जणांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 296/2026 दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत. गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांनी केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.






