जमिनीच्या व्यवहारातून वाद, सासवडमध्ये कोयते, पिस्तूल घेऊन हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्नचा गुन्हा दाखल,
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
जमिनीच्या व्यवहारातून वाद; सासवडमध्ये श्रीगणेश ऑफिसवर कोयते, पिस्तूल घेऊन हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
सासवड, दि. १९ जुलै : सासवड शहरातील श्रीगणेश ऑफिसमध्ये जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून सात जणांनी कोयते, पिस्तूल व लाकडी दांडक्यांच्या जोरावर धुडगूस घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना रविवारी घडली. या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सतीश शंकर गायकवाड (वय ३६, रा. भिवडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बोरकर, वेदांत कटके, निखिल कामठे, शुभम बडदे, ज्ञानेश म्हेत्रे, नानजी उर्फ तुकाराम बडदे आणि सुरज जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सासवड येथील बाळासाहेब भिंताडे यांच्या श्रीगणेश ऑफिसमध्ये फिर्यादी सतीश गायकवाड, त्यांचे भागीदार दिलीप भिंताडे व इतर काही जण जमिनीच्या व्यवहारासंदर्भात चर्चा करत बसले होते.
यावेळी आरोपी तेथे आले आणि “अलका जगताप यांची जमीन तुम्हाला द्यायची नाही, जास्त शहाणपणा केलात तर गोळ्या घालू, त्या जागेवर आलात तर एकही जिवंत सोडणार नाही, जमीन हवी असेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपी अभिषेक बोरकर याने हातातील पिस्तूल टेबलच्या काचेवर आपटून काच फोडली. त्याचवेळी वेदांत कटके याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी मागे सरकल्याने वार हुकला.
यावेळी नानजी उर्फ तुकाराम बडदे याने फिर्यादीच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, इतर आरोपींनी कार्यालयात तोडफोड करत दहशत माजवली.
परिसरात भीतीचे वातावरण
गोंधळ वाढल्यानंतर आरोपी कार्यालयाबाहेर आले आणि हातातील कोयते व लाकडी दांडके हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी तातडीने दुकानांचे शटर खाली ओढले, तर नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी कशाबशा आरोपींच्या तावडीतून सुटून सासवड पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर आरोपी काळ्या रंगाच्या थार (क्रमांक 7301) व हुंडाई आय-20 कारमधून पसार झाल्याचे समोर आले.
गंभीर कलमांखाली गुन्हा
या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकी, दंगल, मालमत्तेची तोडफोड आदी गंभीर कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियम व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही आरोपींवर पूर्वीचेही गुन्हे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील काही आरोपींवर यापूर्वीही खूनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, शस्त्र बाळगणे, दारूबंदी कायद्याचे उल्लंघन तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे सासवड, जेजुरी, येरवडा, फलटण आणि सोलापूर येथील विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत.
सदर घटणेबाबत माहिती मिळतच काही क्षणात 3 टीम करून आरोपीचा शोध घेताना आरॊपी बोपदेव रोडने गेल्याचे माहिती काढून पाठलाग केला असता हिवरे गावचे परिसरात असल्याची माहिती मिळाली पोलीस पोहचताच आरोपीनी उसाच्या शेतात पळून जाताना पाठलाग करून कोडीत गावचे परिसरात 4 आरोपीना ताब्यात घेतले असून इतर आरोपीचा शोध चालू आहें. यातील अनेक आरोपीवर अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील काळात अजून कडक कारवाई करणार आहोत. दोन वाहने ताब्यात घेण्यात आले असून
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत असून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.






