ब्रेकिंग न्यूज

पुरंदरच्या पत्रकारितेत नवा अध्याय ; ‘ वेधबिंदू ‘ साप्ताहिक लवकरच वाचकांच्या भेटीला!


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :

पुरंदरच्या पत्रकारितेत नवा अध्याय;‘वेधबिंदू’ साप्ताहिक लवकरच वाचकांच्या भेटीला

पुरंदर ( प्रतिनिधी ) – पुरंदर तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रात आता एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. ‘वेधबिंदू’ या नावाने साप्ताहिक लवकरच पुरंदरच्या वाचकांच्या भेटीला येत असून, डिजिटल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील दांडगा अनुभव असलेले निलेश जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गिरीश झगडे यांच्या पुढाकारातून या साप्ताहिकाची सुरुवात करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, ‘वेधबिंदू’ साप्ताहिकाला प्रेस रजिस्ट्रार जनरल (Press Registrar General of India) यांच्याकडून अधिकृत परवानगी मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या साप्ताहिकाच्या नोंदणीसाठी आवश्यक प्रक्रिया आणि त्यासाठीचा पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, ‘वेधबिंदू’च्या प्रकाशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पुरंदर तालुक्यातील स्थानिक प्रश्न, जनतेच्या समस्या, गावागावातील घडामोडी, प्रशासनाचा कारभार, सामाजिक उपक्रम, शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती यांना प्रभावी व्यासपीठ देण्याचा प्रयत्न ‘वेधबिंदू’च्या माध्यमातून केला जाणार आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर बदलत्या माध्यमविश्वाशी सुसंगत पत्रकारिता करण्यासोबतच पारंपरिक साप्ताहिकाच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांचे दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. छापील माध्यमासोबतच डिजिटल माध्यमावरही ‘वेधबिंदू’चा ठसा उमटवण्याची तयारी सुरू आहे.

ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आजही व्यापक चर्चेत येत नाहीत. गावातील नागरिकांच्या अडचणी, प्रशासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न, विकासकामांची वस्तुस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे योगदान यांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. हीच गरज लक्षात घेऊन ‘वेधबिंदू’ची वाटचाल सुरू करण्यात येत आहे.‘सत्यासाठी… जनतेसोबत!’ ही भूमिका घेऊन ‘वेधबिंदू’ची वाटचाल सुरू होणार असून, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत निर्भीड, जबाबदार आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा प्रयत्न करण्याचा मानस आहे.

गेल्या काही महिन्यांपासून साप्ताहिकाच्या अधिकृत नोंदणीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर आता साप्ताहिकाच्या प्रत्यक्ष प्रकाशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, ‘वेधबिंदू’ साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुरंदरच्या पत्रकारिता क्षेत्रात नव्या माध्यमाच्या आगमनाची उत्सुकता निर्माण झाली आहे.पुरंदरच्या प्रत्येक प्रश्नाचा वेध घेण्यासाठी, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सत्याला व्यासपीठ देण्यासाठी ‘वेधबिंदू’ लवकरच आपल्या भेटीला येत आहे.


Translate »
error: Content is protected !!