पानवडीतील वयोवृद्ध दांपत्याच्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ ; आरोपीच्या शोधासाठी सासवड पोलिसांची दोन पथके
# पुरंदर तालुका हादरला! पानवडीत वयोवृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
**आरोपीचा शोध घेण्यासाठी सासवड पोलिसांची दोन पथके रवाना**
**सासवड | प्रतिनिधी**
पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे एका वयोवृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहन बाबुराव धिवार (वय ८३) आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला मोहन धिवार अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी गणेश सुभाष धिवार (वय २६) याने अज्ञात कारणावरून मोहन धिवार यांच्यावर धारदार शस्त्राने हातावर, दंडावर आणि गळ्यावर खोलवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी रत्नमाला धिवार वय वर्ष 72 यांच्यावरही कपाळावर, पाठीवर आणि हातावर वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख शंकर राऊत,सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. दाम्पत्याच्या मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी सासवड पोलिसांनी दोन पथके तयार करून रवाना केली आहेत.
या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला शोधून घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
पानवडी येथील या दुहेरी हत्याकांडामुळे पुरंदर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
**सह्याद्री न्यूज नेटवर्क — पुरंदर**






