क्राईम न्यूज

सासवड पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी मोका मधील आरोपी सासवडमध्ये ऑटोमॅटिक गावठी पिस्टल व दोन काडतूस सह जेरबंद!


सासवड पोलिसांची दमदार कामगिरी; पिस्तूल, दोन काडतुसे सहित सराईत आरोपी जेरबंद

सासवड : सासवड पोलिसांनी गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून मोठी कारवाई करत पिस्तूल व काडतुसे बाळगणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, काडतुसे तसेच मोटारसायकल असा सुमारे १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संतोष घोलवे व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सासवड येथील सैनिक कॅन्टीनच्या पाठीमागे एका व्यक्तीजवळ काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत व पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताची चौकशी केली.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव रोहित राज माने (वय २४, रा. गुजरवाडी, दत्तनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या जवळील मोटारसायकलच्या स्टील बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये पिस्तूल आढळून आले. त्यानंतर आरोपीकडून पिस्तूल व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, ९ हजार रुपये किमतीचे मॅगझीन आणि सुमारे ४५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल असा मुद्देमाल आहे.

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९२/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीवर यापूर्वीही विविध गुन्हे

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी रोहित माने याच्याविरुद्ध यापूर्वी लोणी काळभोर, कोंढवा, खडकी आणि वाघोली पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोलवे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे तसेच पोलीस कर्मचारी दत्तात्रय काळे, विशाल जाधव, गोकुळ हिप्परकर, तुषार लोंढे, प्रवीण शेंडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

सराईत आरोपीकडून पिस्तूल जप्त केल्याने सासवड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


Translate »
error: Content is protected !!