क्राईम न्यूज

सासवडमध्ये अवैध गॅस रिपेरिंग वर मोठी कारवाई ; तब्बल 11.6 लाखांचा मुद्देमाल जप्त


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर मोठी कारवाई; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सासवड (पुरंदर): सासवड पोलीस स्टेशन हद्दीत पुरंदर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने पोलिसांच्या मदतीने अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई करत तब्बल ११ लाख ६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी गोपाल वासुदेव ठाकरे (वय ३७) व पुरवठा निरीक्षक गणेश मखरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे सासवड येथे सासवड–कोंढवा रोडवरील सुप्रभा कंपनीजवळ छापा टाकला. या कारवाईत श्रवणकुमार बाबुराव बिष्णोई (रा. सासवड, ता. पुरंदर, मूळ रा. विश्णुनगर, ता. लोहाट, जि. जोधपूर, राजस्थान) व त्याचा एक साथीदार (फरार) हे कोणताही वैध परवाना नसताना भारत, इंडेन व एचपी गॅस कंपनीच्या सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस रिफिल करत असल्याचे आढळून आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी एक महिंद्रा पॅगो टेम्पो (MH 12 MV 6254), एक मारुती सुझुकी कॅरी (MH 12 WX 1156), ५८ व्यावसायिक गॅस सिलेंडर, ९ घरगुती रिकामे सिलेंडर, ४९ व्यावसायिक रिकामे सिलेंडर, एक वजनकाटा तसेच गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे उपकरण असा एकूण ११,०६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही अवैध रिफिलिंग प्रक्रिया मानवी जीविताला गंभीर धोका निर्माण करणारी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, संबंधितांविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Translate »
error: Content is protected !!