गरीब मेंढपाळाच्या पालावर चोरट्यांचा डल्ला ; चार तोळे सोने लंपास, जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
मेंढपाळाच्या पालावर चोरट्यांचा डल्ला; ४ तोळे सोने लंपास
पुरंदर | प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे बकरी चारण्यासाठी शेतात उभारलेल्या पालातून अज्ञात चोरट्याने १ लाख ८९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अनिल लक्ष्मण तोरवे (वय ३२, रा. कोथळे, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोरवे दाम्पत्य ३१ जुलैपासून कोथळे येथील शेतात बकरी चारण्यासाठी पाल टाकून वास्तव्यास होते. १ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५.४५ या वेळेत ते बकरी चारण्यासाठी बाहेर गेले असता, अज्ञात चोरट्याने पालामध्ये प्रवेश करून स्टीलच्या पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजात दोन तोळ्यांचे सोन्याचे ठुशी/मंगळसूत्र, सोन्याचा नेकलेस, मनचळ्या तसेच चांदीचे विविध दागिने यांचा समावेश असून, एकूण ₹१.८९ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तात्यासाहेब विनायक खाडे करीत आहेत.






