ताज्या घडामोडी

आदर्श माता कै शेवराबाई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली “” या आदर्श मातेच्या संस्कारामुळे लाखो पीडित कुटुंबांना न्याय मिळाला “-मा जिल्हा सरन्यायाधीश डॉ. लेखक नामदेव चव्हाण


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
आदर्श माता कै. शेवराबाई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

“या आदर्श मातेच्या संस्कारामुळे लाखो पीडित कुटुंबांना न्याय मिळाला” — मा. जिल्हा सरन्यायाधीश डॉ. लेखक नामदेव चव्हाण

नायगाव, ता. हवेली, जि. पुणे : माणूस जगून जातो; मात्र काही माणसे अशी असतात की, मातीच्या कुशीत विलीन होताना संपूर्ण समाजाच्या डोळ्यांत अश्रू आणि काळजात प्रेरणेची मशाल पेटवून जातात. आदिवासी समाजाच्या संघर्षाचा भक्कम आधारस्तंभ आणि आपल्या कुशीत केवळ अपत्येच नव्हे, तर माणुसकीचे संस्कार घडविणाऱ्या आदर्श माता कै. शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांच्या निधनाने समाजकार्याच्या क्षितिजावर कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

नायगाव येथे कै. शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांच्या प्रतिमेला मा. जिल्हा सरन्यायाधीश डॉ. लेखक नामदेव चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी भोसले कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या शब्दांत केवळ सांत्वन नव्हते, तर या थोर मातेच्या कार्याबद्दलचा अथांग आदर आणि कृतज्ञता व्यक्त होत होती.

कै. शेवराबाई भोसले यांनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जात मुलांना शिक्षण दिले. त्यांच्या त्यागातून घडलेली पुढील पिढी आज समाजासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. त्यांचा एक मुलगा साहित्यिक भास्कर भोसले शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, दुसरा मुलगा समाजसेवक नामदेव भोसले यांनी हजारो, लाखो पारधी समाजबांधवांना गुन्हेगारीच्या शिक्क्यातून मुक्त करण्यासाठी तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केले आहे. तिसरा मुलगा पत्रकार सुनील ज्ञानदेव भोसले हे पत्रकारितेच्या माध्यमातून निस्वार्थीपणे समाजसेवा करत असून पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कै. शेवराबाई भोसले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना तब्बल २९ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक महिलांना मार्गदर्शन करून त्यांना आत्मविश्वासाने उभे राहण्याची प्रेरणा दिली.

कै. शेवराबाई भोसले यांच्या कार्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी राहत्या जागीच त्यांच्या समाधीची निर्मिती केली होती. अशा प्रकारे आई-वडिलांप्रती असलेली श्रद्धा आणि कृतज्ञता त्यांनी आयुष्यभर जपली.

यावेळी पत्रकार सुनील ज्ञानदेव भोसले यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आईने आयुष्यभर सोसलेला वनवास आणि तिने केलेला त्याग हीच आमची खरी पुंजी आहे. दुःखाच्या या कठीण प्रसंगी गुरुजनांनी घरी येऊन दिलेला आधार हा आमच्यासाठी केवळ दिलासा नसून, आईच्या कार्याला समाजाने दिलेली आदराची पावती आहे.”

यावेळी सौ. लक्ष्मी नामदेव चव्हाण, आकाश नामदेव चव्हाण, अनिल सुनील, राजश्री, सुजाता, ग्रीष्मा, सुरेखा, तुकाराम भोसले तसेच नायगावच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. अलकाताई गायकवाड, बानूताई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कै. शेवराबाई ज्ञानदेव भोसले आणि कै. ज्ञानदेव भोसले या दाम्पत्याचा संघर्ष, त्याग आणि समाजसेवेचा वारसा संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांनी घ्यावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Translate »
error: Content is protected !!