काळदरीत पावसासोबत रंगला बाल वारकऱ्यांचा पालखी सोहळा
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
काळदरीत पावसासोबत रंगला बालवारकऱ्यांचा पालखी सोहळा
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक : कालदरीे येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळदरी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर करीत आषाढी एकादशीनिमित्त विद्यालयाचे प्राचार्य विजय चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचे आयोजन करत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी पालखीत श्री.विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा व शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ठेवण्यात आली होती. यावेळी जि प प्राथमिक शाळा काळदरी व बाल विकास मंदीर काळदरी येथील चिमुकल्या पावलांनी या दिंडी सोहळ्याची रंगत वाढवली. पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे.सातत्य,नियमितपणा व सामूहिक भक्ती ही वारीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारशाची जाण आसावी. त्याचबरोबर दिंडीतील सर्वांच्या सहभागातून धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या संविधानात्मक तत्वांतून राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी व त्यांच्यात अंगीभूत असणारी उपक्रमशीलता वाढीस लागावी या हेतूने आषाढी एकादशीनिमित्त या दिंडीचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजन करण्यात आले.
पालखी सोहळ्याद्वारे समाजाशी जवळीक वाढावी व संत परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने दिंडी काढीत शाळेतील बालवारकऱ्यांनी अवघे गाव भक्तिमय व ज्ञानमय केले. पावसातील सर्वांच्या उत्साहाने अवघा परिसर भक्तीमय झाला होता. या सोहळ्यासाठी विद्यालयाचे प्राध्यापक संतोष नवले, पांडुरंग दुर्गाडे, सुनंदा टकले, कविता शेलार, बाळू पोमणे, शिवाजी गोडसे, संजय भिंताडे, सुनिल घोडके,अशोक भगत यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळेपासून निघालेल्या या दिंडीत अधूनमधून पावसाच्या सरी अंगावर घेत प्रारंभी भगवा ध्वज घेऊन नाचणारे बालवारकरी, त्यांच्यामागे विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिरुपातील विद्यार्थी,नंतर टाळकरी,मध्येच मृदंगवादक, विणेकरी व डोक्यावर ग्रंथ ,तुळशी व रोपे घेऊन आलेल्या बालमहिला वारक-यांसह सर्व विद्यार्थी ‘विठूनामाचा’ जयघोष करीत–’सोपे वर्म आम्हा सांगितले संती! टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा!’ या उक्तीप्रमाणे पाऊल खेळत खेळत गावातील श्री भैरवनाथ मंदिर येथे पालखी सोहळा विसावला. मंदिरासमोर विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व शिक्षक यांनी रिंगण सोहळ्यात अभंग व भजन गात फुगडी व पाऊल खेळण्याचा आनंद घेत दिंडीत रंग भरला. नंतर पुन्हा पावसाच्या धारा झेलत दिंडी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा जवळ ही दिंडी स्थिरावली. मंदिरासमोर विठ्ठल आरती करुन दिंडी पुढे काळदरी ग्रामपंचायती समोरुन विद्यालयाकडे परत येत असताना एस टी बस थांबली व बसमधील प्रवासी, एसटी चालक व वाहक यांनीही अभंग, भजन सादर करीत या दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली. या मार्गावर अनेक महिलांनी प्रतिरुपातील विठ्ठल- रुक्मिणी,संत तुकाराम,संत नामदेव यांचेसह पालखीचे औक्षण करुन स्वागत केले.
यावेळी माजी जि प सदस्य बबुसाहेब माहुरकर, माजी पोलीस पाटील रावसाहेब कारकर, शिवव्याख्याते व ह.भ.प. प्रमोद कारकर, प्रशांत शेंडकर, एकनाथ महांगरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजीव महापुरे, शैला जाधव, रेखा कारकर, रुपाली महांगरे, संध्या महांगरे, संगिता परखंडे, नंदा कोंढाळकर व ओम काळे यांचेसह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






