पुणे

पांडेश्वर येथे शेवटचा श्रावणी सोमवार उत्साहात ; पांडेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, जीर्णोद्धारासह तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
संपादक नवनाथ राणे:
पांडेश्वर येथे शेवटचा श्रावणी सोमवार उत्साहात

पांडेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; मंदिराच्या जीर्णोद्धारासह तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी

पांडेश्वर : पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेल्या पांडेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच भाविकांनी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात रांगा लावल्या होत्या. हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

पांडेश्वर हे पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सिंहासनावर विराजमान असलेली शिवशंकराची पिंड असून, पांडवांनी पंडू राजाचे श्राद्ध याच पवित्र ठिकाणी घातल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या मंदिराला मोठे धार्मिक महात्म्य प्राप्त झाले आहे.

श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरात महादेवाची महापूजा करण्यात येते. तसेच समस्त ग्रामस्थ पांडेश्वर, जवळार्जुन आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

मात्र, एवढे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असूनही पांडेश्वर मंदिर आणि तीर्थक्षेत्राकडे शासनाचे पुरेसे लक्ष नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मंदिराचा विकास, परिसरातील मूलभूत सुविधा आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंदिराचे पुजारी दळवी यांनी पांडेश्वर मंदिराचा शासनाने जीर्णोद्धार करावा तसेच या ठिकाणाला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे शासनाने या ऐतिहासिक धार्मिक स्थळाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व भाविकांकडून व्यक्त होत आहे.


Translate »
error: Content is protected !!