न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन मध्ये शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण; व शिक्षकांचा सन्मान
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे उपसंपादक नवनाथ राणे :न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुनमध्ये शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण; शिक्षकांचा सन्मान
जवळार्जुन : भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुन विद्यालयात शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास गावचे माजी सरपंच अण्णासाहेब राणे, सोमेश्वर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुधाकर टेकवडे, ग्रामपंचायत प्रशासक सोमनाथ कणसे, माजी मुख्याध्यापक निगडे सर, सतीश साळुंखे, जनार्दन टेकवडे, दिलीप टेकवडे, सचिन टेकवडे, बाबासो राणे, सुरेश टेकवडे तसेच पत्रकार नवनाथ राणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी वड, पिंपळ, लिंब, चिंच यांसह ऑक्सिजनपूरक वृक्षांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी हा आगळावेगळा उपक्रम राबविला.
विशेष म्हणजे, दिवसभर विद्यालयातील विद्यार्थीच शिक्षकांच्या भूमिकेत दिसून आले. विद्यार्थ्यांनी अध्ययन-अध्यापनाचे कामकाज करत शिक्षक होण्याचा अनुभव घेतला आणि त्याचा आनंद लुटला. या उपक्रमातून शिक्षकांचे कार्य, जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व सांगताना, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. शिक्षक हा राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा आधारस्तंभ असून त्यांच्या विचारातून उद्याचे आदर्श नागरिक घडत असतात,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुराव गायकवाड सर व आभार व नियोजन दिवाने मॅडम व सर्व शिक्षक वृंदांनी केले






