सासवड जेजुरीच्या भुयारी गटारी योजना मार्गी लावणार विधानसभेत मंत्री उदय सामंत यांची घोषणा, आमदार विजय शिवतारे यांची लक्षवेधी
सह्याद्री माझा प्रतिनिधी::
*सासवड जेजुरीच्या भुयारी गटार योजना मार्गी लावणार*
विधानसभेत मंत्री उदय सामंत यांची घोषणा
पुणे जिल्ह्यातील सासवड आणि जेजुरी शहरातील भुयारी गटार योजना लवकरात लवकर मार्गी लावण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना उदय सामंत यांनी ही घोषणा केली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आज या कामकाजदरम्यान आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या मतदारसंघातील या दोनही शहरांच्या भूमिगत गटार योजना, शहरातील रस्ते आणि कऱ्हा नदीच्या प्रदूषणाचा विषय मांडला. सभागृहात बोलताना शिवतारे म्हणाले,
दोनही नगरपालिका या साधारणतः १८७९-८० च्या सुमारास अस्तित्वात आल्या आहेत. गेली काही दशके इथे विशिष्ट कुटुंबांच्या सत्ता राहिलेल्या आहेत. दुर्दैवाने या काळात शहरातील रस्ते आणि गटारे याबाबत अत्यंत भयानक अवस्था आहे.
जेजुरी शहरात मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला आणि सासवड शहरात संत सोपानकाका यांच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात. परंतु येथील घाणीच्या साम्राज्यामुळे भाविक नाराजी व्यक्त करतात. सन २०१८ साली महायुती सरकार असताना सासवडसाठी भुयारी गटार योजना मंजूर झाली परंतु ती अर्धवट अवस्थेत आहे.
ठेकेदाराने वारंवार नोटिसा देऊनही काम सुरू केलेले नाही. त्याला काळया यादीत टाकून शहराला आवश्यक निधीची तरतूद करावी अशी मागणी यावेळी शिवतारे यांनी केली.
यावर सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सासवड आणि जेजुरीच्या या प्रश्नावर उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल. तसेच संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकले जाईल. याशिवाय सासवड (टप्पा २) व जेजुरीसाठी आवश्यक असलेल्या अनुक्रमे ८३ व ८२ कोटींच्या निधीची तरतूद केली जाईल.






