मार्गशीर्ष वद्य अमावस्या निमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; “श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिका लोकार्पण सोहळा संपन्न
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
मार्गशीर्ष वैद्य अमावस्यानिमित्त म्हस्कोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी “श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिका “लोकार्पण सोहळा संपन्न
प्रतिनिधी | मार्गशीर्ष वद्य अमावस्येच्या पावन पर्वानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजता देऊळवाडा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी ५ ते ६ या वेळेत मुख्य गाभारा बंद ठेवण्यात आला होता. सकाळी ६ वाजता मुख्य गाभाराही दर्शनासाठी खुला करण्यात आला.
दिवसभर दगडी कासवावर पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. सकाळपासून देवस्थान व भाविकांच्या वतीने श्रीनाथ म्हस्कोबा देवास अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता दहीभाताची विधिवत पूजा करून देवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला.
दुपारी १२ वाजता धूपारती झाल्यानंतर मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. रात्री १०.३० वाजता देऊळवाडा दर्शनासाठी बंद करण्यात आला.
आज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन श्री. सदाबापू धोंडीबा सातव, कै. शंकरराव धुमाळ व परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत “श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिका” या बारमाही दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी देवस्थानचे सर्व विश्वस्त, सल्लागार, मानकरी, सालकरी, पाटील तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पाणी, दर्शनबारी व्यवस्था, अतिरिक्त होमगार्ड, प्रकाशयोजना तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. येणाऱ्या यात्रा उत्सवाच्या तयारीत संपूर्ण मंदिर व्यवस्थापन सज्ज असल्याची माहिती श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व सल्लागार यांनी दिली.






