ब्रेकिंग न्यूज

भिवरीतील तरुणांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुले सुखरूप पालकांच्या स्वाधीन ::


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
भिवरीतील तरुणांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुले सुखरूप पालकांच्या स्वाधीन

भिवरी-बोपगाव येथील श्री कानिफनाथ मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेली आणि गर्दीत हरवलेली दोन लहान मुले भिवरी गावातील जागरूक तरुणांच्या सतर्कतेमुळे आणि सासवड पोलिसांच्या मदतीने सुखरूप आपल्या आईच्या कुशीत परतली आहेत. या घटनेमुळे परिसरात तरुणांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हडपसर (सातव नगर) येथील रहिवासी असलेल्या श्रीमती श्रीदेवी दुधभाते या आपल्या बहिणीच्या मुलासोबत आणि स्वतःच्या मुलांसह कानिफनाथ गडावर दर्शनासाठी आल्या होत्या.

यावेळी गर्दीमुळे गणेश खंडाप्पा मरगे व मान्तेश बिराप्पा दुधभाते ही दोन मुले आईची नजर चुकून रस्ता भरकटली आणि भिवरी गावाच्या परिसरात पोहोचली

ही मुले घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे भिवरी येथील स्थानिक तरुण आर्यन श्रीकांत येळंवडे, स्वराज संतोष कटके, सारंग तुषार कटके, करुण अजय ढवळे, विवेक नानासो येळंवडे आणि तन्मय योगेश कटके यांच्या निदर्शनास आले. मुलांकडे चौकशी केली असता ती हरवल्याचे लक्षात येताच, या तरुणांनी वेळ न घालवता तातडीने सासवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि मुलांना स्वतः पोलिसांकडे नेले.

सासवड पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. अर्जुन चोरगे साहेब, अविनाश होळकर साहेब आणि अक्षय चिले साहेब यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्रे फिरवली. मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन हडपसर येथील त्यांच्या आईशी संपर्क साधला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही मुलांना आई श्रीदेवी दुधभाते यांच्या स्वाधीन करण्यात आले.

​आपली मुले सुखरूप मिळाल्याने दुधभाते कुटुंबाने भिवरीतील तरुण आणि सासवड पोलीस प्रशासनाचे डोळ्यात पाणी आणून आभार मानले. तरुणांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र स्वागत होत आहे.


Translate »
error: Content is protected !!