सासवड बाहयवळण रोड वरील आंबोडी उड्डाणपुलावर भीषण अपघात ; तीन जण गंभीर जखमी :
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवड बाह्यवळणावरील आंबोडी उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ब्रेझा कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक, तिघे गंभीर जखमी
पुरंदर तालुक्यातील सासवड बाह्यवळणावरील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्ग (क्र. ९६५) वरील आंबोडी उड्डाणपुलावर आज भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने समोर चाललेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले.
या अपघातात ट्रॅक्टर चालक दत्तात्रेय शिवाजी पवार (वय ५१, रा. पवारवाडी) तसेच कारमधील योगेश वाघमोडे (रा. फुरसुंगी) आणि अथर्व बंडगर (रा. उरुळी देवाची) हे गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रेय पवार हे त्यांच्या पाळीव जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ट्रॅक्टर (क्र. MH-12-JL-4823) व ट्रॉलीसह सासवडहून जेजुरीकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ब्रेझा कार (क्र. MH-12-SE-7386) ने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावर आडवी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
अपघातामुळे सुमारे दीड तास वाहतूक सर्व्हिस रोडने वळवण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी भिवराज शिंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हटवत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, पुणे–पंढरपूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावर अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
सासवड पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.






