सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेसाठी पुरंदर तालुक्यातील 58 शेती गट सज्ज, मुख्यमंत्र्यांनी केला स्पर्धेचा ऑनलाईन शुभारंभ
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
पुरंदर प्रतिनिधी समीर भिंगारदिवे :
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचा डिजिटल शुभारंभ; सासवड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सासवड (ता. पुरंदर) : आज, दि. २९ जून २०२६ रोजी पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेचा डिजिटल शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते आमिर खान यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण सासवड येथील पंचायत समिती सभागृहात तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
यावेळी अंजीर व सिताफळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ युवराज बालगुडे यांनी शेतकऱ्यांना अंजीर व सिताफळ पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापन, त्यावरील उपाययोजना तसेच खरीप हंगामातील विविध पिकांच्या लागवड व व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपकृषी अधिकारी संदीप कदम, सहाय्यक कृषी अधिकारी अतुल हिंगणे, पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंखे, उमेद अभियानाच्या तालुका समन्वयक नंदा कुरडे, गणेश किकले, रमेश भंडलकर तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुरंदर तालुक्यातील विविध शेतकरी गट, महिला शेतकरी गट तसेच कृषी महाविद्यालय, पुणे येथील RAWE (Rural Agricultural Work Experience) कार्यक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यात आलेल्या विद्यार्थिनींनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
सध्या पुरंदर तालुक्यात पाणी फाउंडेशनचे ५५ शेतकरी गट कार्यरत असून भात, बाजरी, सोयाबीन, वाटाणा, भुईमूग आणि कांदा या पिकांसाठी विविध शेतकरी गट सक्रियपणे काम करत आहेत. फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून शाश्वत शेती, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






