पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते फार्मर कप 2026 स्पर्धेत तोंडल येथील साई शेतकरी गटाचा आदर्श उपक्रम
संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
पाणी फाउंडेन, उमेद व कृषी विभाग पुरंदर सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ स्पर्धेत तोंडल येथील साई शेतकरी गटाचा आदर्श उपक्रम
पुरंदर तालुक्यातील तोंडल येथील साई शेतकरी गटाने पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ स्पर्धेत खरीप हंगामासाठी सोयाबीन पिकाची निवड केली असून, आज (दि. ६ जुलै २०२६) गटातील सर्व शेतकरी एकत्र येऊन बीज उगवण क्षमता चाचणी केली.
या चाचणीत ओल्या गोणपाटावर १०० बिया अंथरून त्या बांधून सावलीत ठेवण्यात आल्या. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त बिया उगवल्यास बियाणे दर्जेदार समजले जाते, तर त्यापेक्षा कमी उगवण झाल्यास नवीन बियाणे घेण्याचा सल्ला दिला जातो. या प्रक्रियेमुळे पेरणीपूर्वीच बियाण्याची गुणवत्ता समजते आणि दुबार पेरणीचा खर्च टाळण्यास मदत होते.
यापूर्वी गटातील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे दशपर्णी अर्क तयार केला आहे. दहा प्रकारच्या जंगली, डोंगराळ व कडू झाडांच्या पानांपासून तयार होणारा हा नैसर्गिक अर्क ३० दिवसांनी फवारणीसाठी तयार होतो. २५ मिली अर्क प्रति लिटर पाण्यात मिसळून सर्व पिकांवर फवारणी करता येते. त्यामुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे आदी विविध किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. दर दहा दिवसांनी फवारणी केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर व खर्च कमी होऊन सेंद्रिय शेतीला चालना मिळते. तसेच हा अर्क मानवी आरोग्य व पर्यावरणासाठीही सुरक्षित आहे.
फार्मर कप स्पर्धेतील सहभागी शेतकरी गटांना पाणी फाउंडेशनची टीम व मेंटॉर लागवडीपूर्व तयारीपासून ते पीक व्यवस्थापनाच्या प्रत्येक टप्प्यावर व्हिडिओ कॉल तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे मार्गदर्शन करत आहेत. सध्या तालुक्यात संदीप कदम, अतुल हिंगणे आणि गणेश किकले हे मेंटॉर म्हणून कार्यरत असून, ते विविध गावांमध्ये जाऊन शेतकरी गटांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करत आहेत.
या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंखे आणि पंचायत समितीच्या उमेद अभियानाच्या नंदा कुरडे यांच्या मार्गदर्शन व समन्वयामुळे पुरंदर तालुक्यातील सर्व गटांचे काम उत्साहात सुरू आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवरील खर्च कमी होत असून सेंद्रिय शेतीकडे त्यांची वाटचाल अधिक वेगाने होत आहे.”
पाणी फाउंडेशन,उमेद व पुरंदर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही फार्मर कप स्पर्धा पार पडत असून तालुक्यातील जवळपास 48 शेतकरी बचत गटांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, तीनही संस्थेच्या समन्वयातून सर्वांचे मार्गदर्शन होऊन शेतकऱ्यांना लाभ होत आहे






