सासवड – सागर मेडिकल दुकान फोडून एक लाख 70 हजार रुपयाची रोकड लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल :
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवडमध्ये मेडिकल दुकान फोडून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
सासवड (प्रतिनिधी): सासवड शहरातील जेजुरी नाका परिसरातील माउली कॉर्नर येथील सागर मेडिकलमध्ये चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून कुलूप तोडत तब्बल १ लाख ७० हजार ५० रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सागर शहाजी सस्ते (वय ३८, रा. सोपाननगर, सासवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २३ जुलै रोजी रात्री ९.३० ते २४ जुलै रोजी सकाळी ९.०० या कालावधीत जेजुरी नाका येथील माउली कॉर्नरच्या पहिल्या मजल्यावरील सागर मेडिकलमध्ये घडली.
चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून कुलूप तोडले आणि गल्ल्यातील १,७०,०५० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(४) अन्वये सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भिवराज शिंदे करीत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.






