सासवड मध्ये बिंगो जुगारावर सासवड पोलिसांचा छापा ; रोख रकमेसह टीव्ही जप्त
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवडमध्ये बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा; रोख रकमेसह टीव्ही जप्त
सासवड | प्रतिनिधी
सासवड शहरातील खंडोबानगर झोपडपट्टी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगारावर सासवड पोलिसांनी छापा टाकून दोघांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, टीव्ही आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास खंडोबानगर झोपडपट्टी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी सोपान आनंदा उबाळे (वय ३१, रा. हिवरकरमळा, सासवड) आणि किरण प्रकाश सोळंकी (रा. खंडोबानगर झोपडपट्टी) हे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन अंकांच्या चित्रांवर पैसे लावत ‘बिंगो’ नावाचा जुगार खेळवत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत ४ हजार ८२० रुपये रोख, अंदाजे १० हजार रुपये किमतीचा ३२ इंची Hyundai कंपनीचा टीव्ही तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिकचा अंकांचा बोर्ड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७५/२०२६, महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस कॉन्स्टेबल प्रविण श्रीमंत शेंडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. तपास पोलीस हवालदार शिंदे करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






