सासवडमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने 21 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
सासवडमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने ₹21.75 लाखांची फसवणूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सासवड | प्रतिनिधी
सासवड पोलीस ठाण्यात क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ₹21 लाख 75 हजार 900 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. हर्षदा अमोल मु-हे (वय 36, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर 2024 पासून आरोपींनी TRILLIONER कंपनीच्या TLC 2.0 प्री-लाँच क्रिप्टो कॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास 40% बोनस कॉईन, दरमहा 4 ते 5 टक्के परतावा तसेच दामदुप्पट ते पाचपट नफा मिळेल असे खोटे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांकडून विविध तारखांना RTGS व ऑनलाइन व्यवहारांद्वारे एकूण ₹21,75,900/- इतकी रक्कम स्वीकारली. सुरुवातीला काही परतावा देऊन विश्वास निर्माण करण्यात आला. मात्र त्यानंतर मूळ रक्कम व उर्वरित परतावा देण्यास टाळाटाळ करत कंपनीचे मार्केट घसरल्याचे कारण सांगून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी शुभम जगताप, संतोष कटके, संकेत इनामके, अनिता प्रकाश जगताप (सर्व रा. सासवड) आणि कालिका ज्ञानेश्वर शिंदे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 361/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम आणि पुरस्कार चिठ्ठी व पैशांचा खप प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत.






