क्राईम न्यूज

सासवड हिवरे रोडवरील सैनिक कॅन्टीन फोडणारा अट्टल चोर एलसीबीच्या जाळ्यात ;


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवड सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोर एलसीबीच्या जाळ्यात

सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे उलगडला गुन्हा; सुमारे १ लाखांचा मुद्देमाल जप्त

सासवड ता. २९ : सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावरील पत्रे उचकटून चित्रपटातील थरारक शैलीत चोरी करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक करत गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. आरोपीकडून चोरीस गेलेल्या मालापैकी सुमारे १,०८,३६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत घरफोडीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद विश्वनाथ यादव (रा. कात्रज, पुणे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सोमवार २० रोजी रात्री ९ ते मंगळवार २१ रोजी पहाटे ५ या कालावधीत सासवड-हिवरे रस्त्यावरील दत्तनगर येथील सैनिक कॅन्टीनमध्ये अज्ञात चोरट्याने छतावरील पत्र्याचे नट-बोल्ट काढून सुमारे ८ ते १० फूट लांबीची साडी लोखंडी अँगलला बांधून तिच्या साहाय्याने कॅन्टीनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शालेय बॅग, महिलांचे कपडे, जिन्स, टी-शर्ट, रे-बॅन गॉगल्स, किराणा साहित्य, खाद्यतेल, ड्रायफ्रूट्स, तांदूळ, साबण, बिस्किटे तसेच विविध कॉस्मेटिक वस्तू असा
१,०८,३६० किमतीचा ऐवज चोरून नेला होता.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित उमेश गोसावी याला जेजुरी येथून ताब्यात घेतले. मूळचा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील उंचनाटी गावचा असलेला गोसावी सध्या जेजुरी येथे वास्तव्यास होता.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात आरोपीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी आणि कट रचल्याप्रकरणी यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तो सराईत घरफोड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या इतर गुन्ह्यांबाबतही तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे व विनोद भोकरे, सहाय्यक फौजदार संतोष तोडकर तसेच पोलीस हवालदार महेश खरात, विशाल भोरडे, अक्षय यादव, संतोष भापकर, अतुल डेरे आणि राजू मोमीन यांनी सहभाग घेतला.


Translate »
error: Content is protected !!