ताज्या घडामोडीपुणे

वटसावित्री पौर्णिमेला विमानतळ बाधित महिलांचा पुकार;विमानतळ त्वरित रद्द करा, आमच्या जमिनी, वृक्ष पिढ्यांचे रक्षण करा


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::

पुरंदर विमानतळ प्रकल्प त्वरित रद्द करा – आमच्या जमिनी, वृक्ष, पिढ्यांची रक्षण करा

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक एका लढणाऱ्या बहिणीच्या अंतःकरणातून हे पत्र लिहित आहे. मी त्या मातीतून आलेली आहे, जिच्यावर माझ्या पिढ्यानपिढ्यांनी कष्ट करून अन्न पिकवल . मी त्या वटवृक्षाच्या सावलीत वाढले आहे, जो आजही नाते, श्रद्धा आणि निसर्गाचं प्रतीक आहे.
आणि आज त्या मातीत, त्या वृक्षावर, आणि त्या नात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे बुलडोझर चालवण्याचा डाव मांडला जातोय – विकासाच्या नावाखाली, आमच्या परवानगीशिवाय, आमच्या अस्तित्वाच्या मुळांवर घाव घालून!

तुम्ही म्हणता: “अन्याय होऊ देणार नाही, चांगले पैसे मिळतील.”
पण आम्हाला पैशांची भूक नाही – आम्हाला मातीची ओढ आहे, आमच्या पूर्वजांची ठेव जपायची आहे. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी शुद्ध हवा, निसर्ग, आणि नद्या जपायच्या आहेत.
तुम्ही म्हणता: “विकास हवा!”

पण असा विकास काय कामाचा, जो कर्‍हा माईला धोका निर्माण करतो? जो वटपौर्णिमेच्या वृक्षांना मुळासकट उपटतो? जो स्त्रियांच्या श्रमाची, त्यांच्या जमिनीची लक्तरं वेशीवर टांगतो?
आज आम्ही न्याय मागतोय – तुमच्या शासकीय शिक्क्यांनी आमच्या जमिनींवर टाकलेले धोक्याचे सावट दूर करा. आमच्या 7/12 उताऱ्यावरून प्रकल्पाचा शिक्का काढा.

जसा यमदेवाकडून सावित्रीने सत्यवानाचं सौभाग्य परत मिळवलं, तसा आम्हीही न्याय मागतोय – जमीन, झाडं, नदी, आणि जगण्याचा हक्क परत मागतोय.
महारष्ट्र राज्यात आम्ही दलाल, भू-माफिया, खाजगी गुंतवणूकदारांच्या नफ्यासाठी बळी देणारे नाही.

आमच्या वृक्षांचं, जमिनीचं, पर्यावरणाचं आणि पिढ्यांचं रक्षण करा.
विकास हवा, पण अन्याय करून नाही! शाश्वत भविष्य हवं, पण शेतकऱ्यांना संपवून नाही! आमच्या जमिनी पिढीजात आहेत – विकायच्या नाहीत!

लढणारी बाधित शेतकरी महिला,
गाव – खानवडी,लढणारी बाधित एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, उदाची वाडी, वनपुरी, पारगाव.
तालुका – पुरंदर, जिल्हा – पुणे , राज्य – महाराष्ट्र यांनी आज वटपौर्णिमानिमित्त मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री दोन्ही , महसूलमंत्री व जिल्हाधिकारी याना निवेदन पाठवलं आहे असे लढणारी बाधित शेतकरी महिला यांनी माहिती दिली.


Translate »
error: Content is protected !!