पुरंदर तालुका पत्रकारांच्या स्वप्नांना आकार; ” आर. एम .धारिवाल फाउंडेशनच्या माध्यमातून 75 लाखांचा हातभार “
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
पुरंदर तालुका पत्रकारांच्या स्वप्नांना आकार;
आर. एम. धारीवाल फाउंडेशनचा ७५ लाखांचा हातभार
सासवड ता.०६: पुरंदर तालुक्यातील पत्रकारांच्या एकजुटीतून शिवरी(ता.पुरंदर)येथे ‘आदर्शवत पत्रकार भवन’ उभे राहत असून,या पत्रकार भवन बांधकामातील बहुउद्देशीय सभागृहासाठी पुणे येथील आर. एम. धारीवाल फाउंडेशनतर्फे तब्बल ७५ लाख रुपयांची जाहीर केली आहे.
गुरुवार (दि.६) रोजी या निधीपैकी सुरुवातीला २० लाख रुपयांचा धनादेश फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल यांच्या हस्ते पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे,मार्गदर्शक प्रकाश फाळके,समन्वयक किशोर कुदळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.या प्रसंगी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच धारीवाल फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पत्रकार समाजाचे आरसे आहेत.त्यांच्यासाठी सुसज्ज सुविधा निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे. पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी दाखवलेली एकजूट ही खरंच कौतुकास्पद आहे. आजच्या काळात पत्रकारांनी समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी फक्त लेखणी नव्हे तर संघटित प्रयत्नांची ताकदही दाखवली आहे. हे पत्रकार भवन त्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरेल, असे मत शोभा रसिकलाल धारीवाल यांनी व्यक्त केले.
शिवरी येथे उभे राहत असलेले हे ‘आदर्शवत पत्रकार भवन’ पुरंदर तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्यामुळे ही वास्तू लवकरच पूर्णत्वास येईल,तर आता या फाउंडेशनच्या मदतीमुळे पत्रकार संघाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून या इमारतीच्या पुर्णत्वाच्या दिशेने हि मदत महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी व्यक्त केला.
तर पत्रकार भवनाचे बांधकाम जलदगतीने सुरू असून,आधुनिक सुविधांनी सज्ज अशी ही वास्तू पत्रकारांच्या कार्यासाठी,सभा,कार्यशाळा आणि पत्रकार प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल.नुकताच या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब भरणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले असल्याचे जेष्ठ मार्गदर्शक बी. एम. काळे, सचिव अमोल बनकर, कार्यकारणी सदस्य समीर भुजबळ यांनी सांगितले.






