पंढरपूरच्या वारीत संत सोपान काका बँकेची सवारी .”बँक ऑन व्हिल्स” व्हॅन च्या माध्यमातून वारितही सुविधा
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
पंढरपूरच्या वारीत संत सोपानकाका बँकेची सवारी.
‘बँक ऑन व्हील्स’ व्हॅन च्या माध्यमातून वारीतही सुविधा.
सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक
दुर्गम भागांतील ग्राहकांना घरपोच बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सासवड येथील संत सोपानकाका सहकारी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘बँक ऑन व्हील्स’ ( मोबाईल बँकिंग व्हॅन) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने या उपक्रमाला परवानगी दिली असून, अशी सेवा सुरू करणारी संत सोपानकाका सहकारी बँक ही पहिलीच बँक आहे. सासवड ते पंढरपूर या मार्गावर पालखी सोहळ्यात ग्राहकांना बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे.सासवड येथे सोपानकाका मंदिराच्या प्रांगणात संत सोपानदेव पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
संत सोपानकाका महाराज देवस्थानचे मालक अॅड. गोपाळ गोसावी आणि अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त, अॅड. त्रिगुण गोपाळ गोसावी तसेच आळंदी देवस्थान चे पालखी सोहळा प्रमुख, डॉ. भावार्थ देखणे, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह-संघटक मंत्री दादा वेदक यांच्या शुभहस्ते या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार संजय जगताप, अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी ढमढेरे, प्रकाश पवार, संचालक राजवर्धिनी जगताप, मनोहर पवार, अॅड युवराज वारघडे, संजय आंबेकर, राजेंद्र बडदे, शरदचंद्र जगताप, मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप साबणे, चंद्रशेखर जगताप, गणेश मोहोळ, विश्वजीत आनंदे तसेच बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षणमहर्षी, सहकारमहर्षी माजी राज्यमंत्री दिवंगत चंदुकाका जगताप यांची पुरंदरच्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी खेडोपाडी शाळा विद्यालय सुरु केले. त्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी पतसंस्था,बँक स्थापन केल्या. विविध बचत गट आणि व्यवसायाच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक साक्षर करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा वारसा त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे.
यापैकी एक असलेल्या संत सोपानकाका बँकेचा जवळपास राज्यभर विस्तार झाला असून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या माध्यमातून प्रयत्न केलाजात आहे.
सोपानकाका बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ आणि हायटेकसेवा देण्यात येत असून आता थेट दारात सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून सध्या आषाढी वारी सुरु असून वारीतील वारकरी, नागरिकांना रोख स्वरूपातील खरेदी किंवा इतर कामासाठी पैशांची सतत अडचण जाणवत असते. बँकेत पैसे असतात मात्र त्याचा वापर करता येत नाही.
हीच गरज लक्षात घेवून सोपानकाका बँकेने वारीतच आर्थिक बँकेचे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.’बँक ऑन व्हील्स’ व्हॅन या उपक्रमातून मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली असून त्यामध्ये कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी २४ तास सेवा उपलब्ध करून देणार आहेत. यामध्ये नवीन खाते उघडणे, रोख रक्कम जमा करणे, पैसे काढणे, चेक स्वरूपातील व्यवहार, एफडी करणे,फोन पे, गुगल पे अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांचा उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केवळ वारीपुरती मर्यादित सुविधा नसून वर्षभर सुविधा गावोगावी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. – संजय जगताप, अध्यक्ष सोपानकाका बँक, सासवड.






