सासवड- खंडोबा नगर मध्ये कंत्राटदारावर हल्ला दोन जणांवर गुन्हा दाखल;
मुख्य संपादक हनुमंत वाबळे:
सासवडमध्ये कंत्राटदारावर हल्ला — दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सासवड (ता. पुरंदर) परिसरातील खंडोबानगर झोपडपट्टी येथे कंत्राटदारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजराज जालिंदर काकडे (वय 30, रा. केशवनगर, सासवड) हे सरकारी कंत्राटदार असून खंडोबानगर झोपडपट्टीतील बोळ्यांमध्ये काँक्रीटीकरणाचे काम करीत होते. त्याचदरम्यान अनिल प्रमोद सोळंकी हा तेथे आला व “येथून हाला, येथे काम करू नको” असे म्हणत त्यांच्याशी वाद घालू लागला.
फिर्यादी यांनी “मी माझे काम करतो आहे” असे सांगितल्यावर आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करून झटापट केली, तसेच हडको-खंडोबानगर रोडवर ओढून नेऊन डाव्या हातावर दगडाने मारहाण केली. त्यानंतर रोशन प्रकाश वाघमारे हा घटनास्थळी आला व त्याने लाकडी रंद्याने काकडे यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध पडले.
जखमी तेजराज काकडे यांना चिंतामणी हॉस्पिटल, सासवड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात त्यांचे घड्याळ हरवले असल्याची नोंदही करण्यात आली आहे.
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 425/2025 भा.दं.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अंतर्गत अनिल प्रमोद सोळंकी आणि रोशन प्रकाश वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शिंदे (ब.क्र. 2824) करीत असून, पुढील कार्यवाही प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.






