क्राईम न्यूज

सासवड – मेडिकल चोऱ्यांचे सत्र सुरूच ; पुन्हा तीन दुकाने फोडली,केमिस्ट असोसिएशनचे सासवड पोलिसांना निवेदन


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवडमध्ये मेडिकल चोर्‍यांचे सत्र सुरूच; पुन्हा तीन दुकाने फोडली, केमिस्ट असोसिएशनचे पोलिसांना निवेदन

सासवड : सासवड शहरात मेडिकल दुकानांना चोरट्यांकडून लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच असून, परवा एकाच रात्रीत तब्बल आठ ते नऊ मेडिकल दुकाने फोडल्यानंतर आज पुन्हा तीन मेडिकल दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. या सलग चोरीच्या घटनांमुळे मेडिकल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आज पुन्हा सासवड पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले. चोरट्यांनी मेडिकल दुकानांमधून कॅडबरी, सौंदर्यप्रसाधने तसेच इतर किरकोळ वस्तूंची चोरी केली असून, गल्ल्यातील सुट्टे पैसेही लंपास केले आहेत. तसेच दुकानांच्या शटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.

या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेली दहशत दूर करावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली.

दरम्यान, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने नुकसानग्रस्त केमिस्ट बांधवांना भरपाई देण्याचे आश्वासन पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे ईसी मेंबर धैर्यशील शिंदे यांनी दिले. तसेच सर्व मेडिकल व्यावसायिकांनी दुकानांच्या शटरला सेंटर लॉक लावावेत, दुकानाच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्या शुभांगी जगताप यांनी तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी आपल्या दुकानाची इन्शुरन्स पॉलिसी उतरवून घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल, तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी पुरंदर तालुका उपाध्यक्ष नंदकुमार जगताप, भूषण ताकवले, सागर सस्ते, रुपेश धुमाळ, मनोज शितोळे, सुमित जगताप, अतुल साळुंखे, मनोज जगदाळे, संदेश गायकवाड, तृप्ती गायकवाड, लांडगे मॅडम, श्री. वढणे आदी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!