निरा – दत्तघाटाच्या पायऱ्या पाण्याखाली ;ब्रिटीशकालीन पुलाच्या काठड्यापर्यंत पाणी, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा!
संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
वीर धरण शंभर टक्के भरले; १५,०११ क्युसेक विसर्गाने नीरा नदी दुथडी भरून वाहिली
दत्ताघाटाच्या पायऱ्या पाण्याखाली; ब्रिटिशकालीन पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
पुरंदर | प्रतिनिधी :
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण शुक्रवारी (दि. २४) शंभर टक्के भरले असून धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यावरून १३,९११ क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे १,१०० क्युसेक असा एकूण १५,०११ क्युसेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी नदीकाठावरील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात जाणे टाळावे तसेच पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणातील आवक लक्षात घेऊन विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने नीरा नदीकाठावरील प्रसिद्ध दत्ताघाटाच्या पायऱ्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच ऐतिहासिक ब्रिटिशकालीन जुन्या पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने नदीचे रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. मात्र, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.
नीरा खोऱ्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे वीर धरण अखेर शंभर टक्के भरल्याने पुरंदर, बारामती, फलटण आणि संपूर्ण नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होणार असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार वीर धरणात ९.४०८ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा असून धरणात ९७१ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. भाटघर धरणात ७०.४८ टक्के, निरा देवघर धरणात ७६.२२ टक्के तर गुंजवणी धरणात ८१.२३ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांमध्ये मिळून ३७.९११ टीएमसी (७८.४४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४०.१२४ टीएमसी (८३.०२ टक्के) होता.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात उतरणे, पूल व घाट परिसरात अनावश्यक गर्दी करणे टाळावे तसेच नदीकाठावरील गावांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे






