काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकीच्या वक्तव्यावरून आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक.
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकीच्या वक्तव्यावरून आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक
पुणे | प्रतिनिधी
मावळचे आमदार सुनील (अण्णा) शेळके यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांबाबत कथितरित्या “गाड्या फोडू आणि थोबाड फोडू” असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
युवक काँग्रेसच्या वतीने पुणे–मुंबई एक्सप्रेसवे परिसरात आमदार शेळके यांच्या वक्तव्याला प्रश्नांच्या माध्यमातून उत्तर देणारे होर्डिंग्ज आणि बॅनर लावण्यात येत आहेत.
युवक काँग्रेसने आमदार सुनील शेळके यांना खालील प्रश्न उपस्थित केले आहेत:
– काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाड्या आणि थोबाड फोडण्याची भाषा करता; मग अजितदादांच्या मृत्यूबाबतच्या चौकशीची मागणी त्याच आक्रमकपणे करणार का?
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील रखडलेल्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीरपणे प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवणार का?
– काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्याची भाषा करणारे आमदार या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का? तसेच मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याची हिंमत दाखवणार का?
“आहे का हिंमत आमदार साहेब?” असा सवाल करत युवक काँग्रेसने, काँग्रेस कार्यकर्त्यांना धमक्या देण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांवर सत्तेला जाब विचारण्याची हिंमत दाखवावी, असे खुले आव्हान दिले आहे.
याबाबत पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आमदार सुनील शेळके यांना विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे काँग्रेस पक्ष मागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोकशाहीमध्ये राजकीय कार्यकर्त्यांना धमकावण्याची भाषा मान्य नसून, अशा वक्तव्याला लोकशाहीच्या चौकटीत प्रश्नांच्या माध्यमातून उत्तर देण्याची भूमिका युवक काँग्रेसने घेतल्याचेही उमेश पवार यांनी स्पष्ट केले.






