सासवड बाह्यवळण आंबोडी उड्डाणपूलाच्या पुढे विद्युत खांबाला धडकून पुन्हा एकदा अपघात निरा मधील तरुण सौरव संभाजी जेधे अपघातात मृत्युमुखी ; निरा गावावर शोककळा
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवड बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
सासवड : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील आंबोडी हद्दीत आज, 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे 8.40 वाजता, भीषण अपघात झाला. या अपघातात सौरव संभाजी जेधे या तरुणाचा गंभीर दुखापतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
सौरव जेधे हा होंडा कंपनीच्या शाईन मोटारसायकल क्रमांक MH-12-ZY 9681 वरून पुणे बाजूकडून जेजुरीच्या दिशेने जात होता. आंबोडी हद्दीतील उड्डाणपूल पार केल्यानंतर त्याची मोटारसायकल घसरली आणि रस्त्याच्या दुभाजकाजवळील विद्युत पोलच्या खांबाला जोरदार धडकली. या अपघातात त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला.
सौरव जेधे हा गरीब कुटुंबातील असून नोकरीनिमित्त टाटा कंपनीत काम करत होता. कामावरून परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 सासवड शहर बाह्यवळण मार्गावर वारंवार अपघात होत असून जीवित व वित्तहानीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच तपासी अंमलदार पोलीस हवालदार अभिजीत कांबळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






