“संत सोपान काका स्वच्छ व सुंदर शाळा” सन्मान सोहळा सासवडमध्ये संपन्न : पाच जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळांचा गौरव
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
“संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” सन्मान सोहळा सासवडमध्ये संपन्न: ५ जिल्ह्यांतील साडेतीन हजार शाळांचा गौरव
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
शिक्षणमहर्षी, सहकाररत्न स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त संत सोपानकाका सहकारी बँक आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड यांच्या वतीने “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” हा अभिनव उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबवण्यात आला.
पुरंदर-हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या संकल्पनेतून आणि संत सोपानकाका फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या ५ जिल्ह्यांतील ६२ तालुक्यांतील सुमारे ३ हजार ५०० शाळांमध्ये हे अभियान राबवण्यात आले. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात झालेल्या सन्मान सोहळ्यात विजेत्या शाळांना गौरवण्यात आले.
चंदुकाकांच्या दूरदृष्टीचा वारसा पुढे नेला
पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी बोलताना चंदुकाका जगताप यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. “गावच्या स्वच्छतेची सुरुवात शाळेपासूनच होते” ही चंदुकाकांची संकल्पना असून, शिक्षण, सहकार आणि सामाजिक कार्याचा त्यांचा हा वारसा माजी आमदार संजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे नेला आहे.
संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियानाचे अनुकरण राज्य सरकारने करून मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा हा उपक्रम सुरू केला. हे चंदुकाकांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे आसगावकर यांनी नमूद केले. तसेच, आमदार संजय जगताप यांनी विधानसभेत शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी आयुक्त कांतीलाल उमाप यांनी पुरंदरची भूमी समृद्ध असून महाराष्ट्राला मार्गदर्शन करत असल्याचे म्हटले. चंदुकाकांचे समाजासाठीचे सर्व क्षेत्रांतील योगदान महत्त्वाचे असून, या उपक्रमातून सर्वांनी स्फूर्ती घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेला प्रोत्साहन
शिक्षणमहर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप हे स्वच्छतेचे प्रणेते होते. त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था, बँका, पतसंस्था आणि विविध संस्थांमध्ये स्वच्छता, प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि प्रगती यावर त्यांचे विशेष लक्ष असायचे.
त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा आदर्श शैक्षणिक क्षेत्रात पुढेही कायम राहावा, या उद्देशाने आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात सुमारे ३ हजार माध्यमिक विद्यालयांची पाहणी करून आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण, गुणवत्ता, भौतिक सुविधा आदी बाबींची पूर्तता केलेल्या शाळांना सन्मानित करण्यात आले. आयोजन व समन्वयक समितीने विभाग व जिल्हास्तरीय शाळांची तपासणी व छाननी करून स्वच्छ व सुंदर शाळांची निवड केली.
पुरस्कारांचे स्वरूप आणि मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यात विभाग स्तरावरील ५ शाळांना ‘उपक्रमशील शाळा पुरस्कारा’ने विशेष सन्मानित करण्यात आले. जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्यांतून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले, त्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तर तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले, त्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप होते. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, राज्याचे माजी आयुक्त कांतीलाल उमाप, सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, रमणिकलाल कोठडीया, सतीश उरसळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
याप्रसंगी संत सोपानकाका सहकारी बँकेच्या संचालिका व ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, सोपानकाका बँकेचे प्रकाश पवार, संचालक धनंजय काकडे, संजय आंबेकर, मार्तंड भोंडे, अरुण थोरात, अमृत पांढरे, प्रसाद गायकवाड, राहुल पवार, राजेश गायकवाड, आर. वाय. पाटील, सुनील काटकर, दादासो लाड, दत्तात्रय गवळी, शिवाजी कामथे, तानाजी माने, संजयकुमार झांबरे, तसेच प्रदीप पोमण यांच्यासह पुणे विभागातील विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानांतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळाही संपन्न झाली. तसेच, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
चंदुकाकांच्या कार्याचा आदर्श व भविष्यातील योजना
माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले की, स्व. चंदुकाका जगताप यांनी पतसंस्था, बँक, शिक्षण संस्था आणि इतर अनेक संस्था स्थापन केल्या. त्यांच्या कामाच्या पद्धतीत पारदर्शकता, शिस्त, स्वच्छता, सुबकता होती. यामुळेच, त्यांच्या जयंतीदिनी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुढील काळात हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे. त्यांनी जुन्या पेन्शन योजनेचाही उल्लेख करत ही सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असून, हा सर्वांचा हक्क आहे. यासाठी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे प्रयत्न असून ते मोठ्या प्रमाणात करावेत, असे आवाहन केले.
संयोजन समितीचे समन्वय प्राचार्य नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, रवींद्रपंत जगताप, दिलीप साबणे, चंद्रशेखर जगताप, विश्वजीत आनंदे, रामप्रभू पेटकर, सतीश शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्राचार्य नंदकुमार सागर यांनी प्रास्ताविकातून स्व. चंदुकाका जगताप यांच्या संकल्पना आणि या अभियानाचा हेतू स्पष्ट केला. दत्तात्रय रोकडे यांनी सूत्रसंचालन केले, सुधाकर जगदाळे यांनी स्वागत केले तर वसंतराव ताकवले यांनी आभार मानले.






