आस्करवाडीतील बिलियन हॉटेलवर हुक्का बारवर सासवड पोलिसांचा छापा ; 11560 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
आस्करवाडीतील बिलीयन्स हॉटेलवर हुक्का बारवर छापा; ११ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सासवड, दि. १६ ऑगस्ट : सासवड पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील बिलीयन्स हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का बारवर छापा टाकून ११ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९१/२०२६ अन्वये ही कारवाई रविवार (दि. १६ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आस्करवाडी गाव हद्दीतील बिलीयन्स हॉटेलमध्ये करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार बाळू लोढे (बक्कल नं. ४३४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर मुरलीधर वाडकर (वय ४३, रा. आस्करवाडी) व संजय बग (वय २४, रा. आस्करवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन काचेचे हुक्का पॉट, विविध कंपन्यांचे तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर, तीन मातीच्या चिलीम, फिल्टर पाईपचे पॅकेट तसेच हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप असा एकूण ११ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का उपलब्ध करून देत हुक्का बार चालवत असल्याचे आढळून आले. त्यानंतर छापा टाकून कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश होळकर (बक्कल नं. १९३६) करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.






