महाराष्ट्र

पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा बनवावा; आमदार विजय शिवतारेंची विधानसभेत मागणी


मुख्य संपादक हनुमान वाबळे::

*पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा बनवावा*
आमदार शिवतारेंची विधानसभेत मागणी

पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांवर देशभरात लोकांची विशेषतः युवकांची प्रचंड श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी लाखो शंभूप्रेमी पुरंदर किल्ल्यावर जाऊन राजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात.

या किल्ल्यावरील महाराजांचे जन्मठिकाण, ज्या वाड्यात ते प्रत्यक्ष राहिले ते ठिकाण, किल्ल्यावरील पुरातन महादेव मंदिर, केदारेश्वराचे मनमोहक आणि अत्यंत प्राचीन मंदिर, बाजीप्रभू देशपांडे यांनी किल्ल्यावर गाजवलेले शौर्य, बाजूलाच असलेला वज्रगड हा पुरंदरचा जोडकिल्ला, भैरवखिंडीतून वज्रगडावर जाणारी वाट, किल्ल्यावरील मोठमोठी दगडी प्रवेशद्वारे, तटबंदी, जमीनदोस्त झालेली राजगादी, ढासळलेले बुरुज या सर्वांचे जतन करणे आवश्यक असल्याने किल्ल्याचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पुरातत्व विभाग आणि पुणे विभागीय आयुक्तांना द्यावेत अशी मागणी आमदार विजय शिवतारे यांनी आज विधिमंडळात केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी सभागृहात औचित्याच्या मुद्याआधारे शिवतारे यांनी पुरंदर किल्ल्याचा विषय सभागृहात मांडला. शिवतारे म्हणाले, पुराणात पुरंदर म्हणजे साक्षात इंद्र असा उल्लेख आहे. पुरंदर पर्वताला इंद्रनील पर्वत असे संबोधण्यात आलेले आहे. हा किल्ला राष्ट्रकुट राजांच्या काळात म्हणजे ७ व्या शतकात बांधलेला असून पुढे तो बहामनी राजांच्या ताब्यात गेला. याच काळात त्याचे नुतनीकरण करण्यात आले.

त्यांनतर तो निजामशाही, आदिलशाही करीत हिंदवी स्वराज्यात सामील झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई याच किल्ल्यापासून अवघ्या काही अंतरावर खळद बेलसर परिसरात झाली. पुरंदरचा ऐतिहासिक तह, बाजीप्रभूंचे शौर्य, संभाजी महाराजांची जडणघडण अशी प्रचंड मोठी पार्श्वभूमी या किल्ल्याला लाभलेली आहे.

सध्या किल्ल्यावरील जुनाट अवशेष भग्न अवस्थेत आहेत. देशभरातील शंभू भक्तांची या किल्ल्याच्या डागडुजी करावी अशी मागणी आहे. हे सर्व लक्षात घेऊन या किल्ल्याचे जतन करण्यासाठी सर्वंकष विकास आराखडा बनवण्याचे आदेश पुरातत्व विभाग, विभागीय आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी पुणे यांना होणे आवश्यक आहे.

शिवतारे पुढे म्हणाले, शिवनेरी किल्ल्यावर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व अनेक मंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळा संपन्न होत असतो. त्याच पद्धतीने पुरंदर किल्ल्यावर शासकीय पद्धतीने होणाऱ्या संभाजी महाराज जयंतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत आपली भूमिका जाहीर करावी आणि किल्ला संवर्धनासाठी विकास आराखडा तत्काळ बनवण्याचे आदेश करावेत.


Translate »
error: Content is protected !!