शैक्षणिक

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत बेलसर च्या जान्हवी कदम हिचे उज्वल यश;


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत बेलसरच्या जान्हवी कदम हिचे उज्ज्वल यश

पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील विद्यार्थिनी जान्हवी सुनील कदम हिने जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा (JNVST 2026) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा मान उंचावला आहे. तिने तब्बल 97.50 टक्के गुण मिळवत पुणे जिल्ह्यात 30 वा क्रमांक पटकावला असून तिची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.

या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातील सुमारे १८ हजार ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यामध्ये जान्हवीने अव्वल कामगिरी करत विशेष यश मिळवले आहे.

जान्हवी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती येथील माजी विद्यार्थिनी असून सध्या ती मातोश्री जिजाई सोपनराव जाधव माध्यमिक विद्यालय, साकुर्डे (ता. पुरंदर) येथे शिक्षण घेत आहे.

तिचे वडील सुनील कदम हे आरोग्य विभागात कार्यरत असून कुटुंबाच्या भक्कम पाठबळासोबतच तिची जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे हे यश शक्य झाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असूनही जान्हवीने उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेत तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक व मान्यवरांनी तिचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत इयत्ता सहावीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातून विद्यार्थी सहभागी होतात. अशा स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

जान्हवीच्या या यशामुळे पुरंदर तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Translate »
error: Content is protected !!