नाझरे जलाशयातून योग्य नियोजनामुळे शेती पिकांना उन्हाळी आवर्तन : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे ::
नाझरे जलाशयातून योग्य नियोजनामुळे शेती पिकांना उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
नाझरे : योग्य नियोजन आणि समन्वयामुळे नाझरे जलाशयातील पाणी यंदा उन्हाळ्यातही शेती पिकांसाठी उपलब्ध झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाझरे, जवळर्जुन व आंबी परिसरातील 130 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पासधारक शेतकऱ्यांनी या पाण्याचा लाभ घेतला आहे.
उपविभागीय अभियंता श्री. कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाधिकारी गणेश गायकवाड, पवार रावसाहेब तसेच कालवा निरीक्षक कैलास बडगुजर, अमित पठाडे, सचिन निंबाळकर, योगेश आडारी, सागर बालगुडे व पार्थ गोसावी यांनी अचूक आणि प्रभावी नियोजन केले. या नियोजनामुळे पाण्याची नासाडी टाळून योग्य पद्धतीने वितरण करण्यात आले.
अनेक वर्षांनंतर मार्च-एप्रिल महिन्यातही जलाशयाचे पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत शेतभेटी घेतल्याने पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित झाला.
या नियोजनामुळे सर्व पासधारक शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याचा लाभ मिळून शेती पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.






