झाडांचे संरक्षण आणि संवर्धन काळाची गरज – डॉ पंडित शेळके अनाथ मुलींनी जाणले वृक्ष लागवडीचे महत्त्व ममता बाल सदन संस्थेचा उपक्रम
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
झाडांचे संरक्षण आणि संवर्धन काळाची गरज
प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांचे प्रतिपादन
अनाथ मुलींनी जाणले वृक्ष लागवडीचे महत्व
ममता बाल सदन संस्थेचा उपक्रम सातत्याने होणारी वाढ व पर्यावरणाचे असंतुलन एक गंभीर समस्या बनली आहे. यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यात झाडे महत्वाची भूमिका बजावतात. झाडे ही ऑक्सिजन निर्मितीचे साधन असल्याने त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची
गरज आहे, असे प्रतिपादन वाघिरे कॉलेज सासवड येथील प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले.
पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण आश्रमात माईंचे पहिले मानसपुत्र तथा संस्थेचे
अध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या वाढ दिवसानिमित्त वनस्पती वनौषधी वृक्ष वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि, भविष्यात वृक्ष टिकले नाहीत तर आपणही टिकणार
नाही. मुलांप्रमाणे झाडांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गाबरोबर राहण्यासाठी वृक्षलागवड ही सुवर्णसंधी आहे. वृक्ष माणसाचे जीवन फुलांनी सुगंधित करून फळांनी रसभरित करतात. पण मानव वृक्षतोड करून आपल्याच
पायावर कुर्हाड मारून घेतो. त्यामुळे वृक्षारोपण ही नितांत गरज ठरली आहे. आपले जीवन आनंदमय, चैतन्यमय होण्यासाठी झाडं वाचवा. असे प्रयत्न केले तर पदराआड दिवा जपल्याप्रमाणे सृष्टी आपल्यावर मायेचे छत्र सदैव
ठेवील, असा विश्वास प्राचार्य डॉ. शेळके यांनी व्यक्त केला. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी माईंची संस्था मोलाची भूमिका बजावत आहे. माई सिंधुताई सपकाळ यांचे वाघिरे कॉलेज सोबत सलोख्याचे संबंध होते. अनेकदा त्या मुलींच्या प्रवेशाकरिता येत असत. आज त्या हयात नाही याच
आम्हाला दुःख आहे. परंतु आपणास कुठलीही मदतीची गरज भासली तर आमच्या संस्थेचे दरवाजे चोवीस तास उघडे आहेत. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असं आश्वासन प्राचार्य डॉ. शेळके यांनी दिले.
यावेळी उपस्थितांना तुळस, कदंब, बेल, आवळा, वड, पिंपळ, चिंच, केशर आंबा, जांभूळ आदी झाडांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी प्राचार्य डॉ. शेळके यांना कदंब वृक्ष भेट दिले. यावेळी
अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश पावसे, संतोष लोणकर, अधीक्षिका स्मिता पानसरे, संजय गायकवाड, सुजाता गायकवाड, मोनिका क्षीरसागर, रुपाली कुंभारकर, सरोज जांगडा यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी यांनी मानले.
मान्यवर काय बोलले ते वाचा
झाडांचा वाढदिवस साजरा करणार…
झाडे लावणे खूप महत्वाचे आहे कारण झाडे वातावरणाला ऑक्सिजन देतात आणि हवेची गुणवत्ता सुधारतात. अधिकाधिक झाडे लावली तर जगाचे पर्यावरण हे राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण बनेल. झाडे लावल्याने
प्रदूषणही कमी होते, ज्यामुळे भावी पिढ्यांचे जीवन वाचते. पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ या पर्यावरण प्रेमी होत्या. निसर्गाला त्या आपले गुरु मानायच्या. आज माईंच्या संस्थेत अनेक प्रकारची फळझाडे लावण्यात आली आहेत. पुढील वर्षी याच तारखेला आज लागवलेल्या सर्व झाडांचा वाढ
दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु करू, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी दिली.
वैभवशाली निसर्गाला अवकळा – डॉ. अविनाश पावसे
निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन्
वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या
अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं. आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे. माणसाने निसर्गाला विद्रूप करायचा जणू चंगच बांधला आहे. एकेकाळी वैभवशाली असलेल्या निसर्गाला अवकळा येत चालली आहे.डॉ. अविनाश पावसे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वाघिरे कॉलेज सासवड.






