ब्रेकिंग न्यूज

गणेशोत्सव व दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सासवडमध्ये गणेश मंडळांची बैठक ; पोलिसांच्या 24 महत्वपूर्ण सूचना


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
गणेशोत्सव व दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सासवडमध्ये गणेश मंडळांची बैठक; पोलिसांच्या २४ महत्त्वपूर्ण सूचना

सासवड : सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी २०२६ च्या अनुषंगाने सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) सासवड नगरपरिषदेत आयोजित करण्यात आली होती. दुपारी ४ ते ४.५० वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरा करण्याबाबत मंडळांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

बैठकीस भोर विभाग सासवडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर,नायब तहसीलदार संदिप पाटील,सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नगरसेवक राजन चंद्रशेखर जगताप, बंडूशेठ राऊत, मयूर चौखंडे, पोलीस पाटील तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांनी मंडळांना तात्पुरता परवाना, वीज जोडणी आणि संबंधित विभागांच्या परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. मंडपातील वीज जोडणी व रोषणाईची महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून तपासणी करून प्रमाणपत्र घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

गणेशमूर्ती व दागिन्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास स्वयंसेवक सुरक्षा रक्षक नेमावेत, पावसाच्या पाण्यापासून मूर्तीचे संरक्षण करावे तसेच मंडपामध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आले. मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची नावे, पत्ते आणि मोबाईल क्रमांकांची यादी मंडपाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, अश्लील गाणी वाजवू नयेत, मिरवणूक शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत पूर्ण करावी आणि मिरवणूक कोणत्याही ठिकाणी विनाकारण जास्त वेळ रेंगाळू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

जात, धर्म, पंथ, व्यक्ती किंवा समाजाच्या भावना दुखावतील असे देखावे, फ्लेक्स, नृत्य अथवा संगीत सादर करू नये, तसेच प्रक्षोभक घोषणा देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या. समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींना मिरवणुकीत सहभागी करून घेऊ नये, असेही पोलिसांनी सांगितले.

महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र रांगा ठेवाव्यात आणि छेडछाडीच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे नशापान करू नये. मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी करून ती सुस्थितीत ठेवावीत, असे निर्देश देण्यात आले.

मिरवणुकीत जाणीवपूर्वक अथवा खोडसाळपणे घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाद न घालता त्यांना तात्काळ पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असेही आवाहन करण्यात आले.

दरम्यान, लेझर लाईटचा वापर कोणत्याही गणेश मंडळाने करू नये. लेझर लाईटचा वापर आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला.

गणेशोत्सव काळात कोणत्याही स्वरूपाचा वाद होणार नाही तसेच पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले.


Translate »
error: Content is protected !!