ब्रेकिंग न्यूज

जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न;


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी संजय निबलकर:
जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात

सांगोला : जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेचा तृतीय वर्धापन दिन रविवार, दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी सदानंद मल्टीपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी सैनिक, त्यांच्या धर्मपत्नी, वीरमाता, वीरपत्नी यांच्यासह सुमारे 500 ते 600 जणांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सांगोला तालुक्यातील वासुद-अकोला, मानेगाव, जवळा, सोनंद, राजापूर, निजामपूर, पाचेगाव बुद्रुक, कोळे, हणमंतगाव, चिणके, कडलास, घेरडी आदी गावांतील आजी-माजी सैनिक संघटनांसह तालुक्यातील विविध गावांमधून माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सोलापूर, सांगली, जत, औंढी, आटपाडी, मंगळवेढा, लेंडवेचिंचाळे, आरग-बेडग, रेवनाळ, मोहोळ, मरवडे, दिघंची, बनपुरी, करमाळा, माळशिरस व माढा येथील आजी-माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

वर्धापन दिनाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सतेश दैवानराव हंगे हे परिवारासह उपस्थित होते. तसेच सूर्योदय ग्रुपचे अध्यक्ष अनिल भाऊ इंगवले, सचिन ज्वेलर्सचे मालक सचिन मिसाळ, किसान व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम, सांगोला विद्यामंदिर कॉलेजचे प्राचार्य चारुदत्त जगताप, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्हाईस मॅनेजर सादिक बागवान, पेन्शनर शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत दिघे गुरुजी, संस्थेच्या वकील अॅड. ज्योती जाधव, स्वास्तिक ज्वेलर्सचे मालक व संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष सुभेदार मेजर रविकांत गणपत मराळ यांनी केले. यावेळी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास, संस्थेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, कार्यप्रणाली, लेखाजोखा तसेच सैनिकांसाठी करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली.

माजी सैनिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी सांगोला तहसीलदार, जिल्हा सैनिक बोर्ड, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, पोलीस प्रशासन, भूमिलेख कार्यालय, सेतू कार्यालय आदींच्या सहकार्याने काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी सैनिकांच्या वतीने सांगोला नगरपरिषद व प्रशासनाकडे विविध मागण्या मांडण्यात आल्या. प्रशासनाच्या इमारतीवर ‘वीर जवान तुझे सलाम’ हा संदेश लिहून वीर सैनिकांचा सन्मान वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. चिंचोली रोड येथील बगीचा क्रमांक 47 येथे उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे उद्घाटन लवकरात लवकर करावे, तसेच या ठिकाणी ‘वॉर ट्रॉफी’ म्हणून क्लास-7 रणगाडा आणण्यासाठी नगरपरिषदेने प्रयत्न करावेत, अशी मागणीही करण्यात आली.

माजी सैनिकांच्या कार्यालयासाठी बिगरभाडेतत्त्वावर गाळा उपलब्ध करून देणे, सैनिक भवनाची निर्मिती तसेच ECH व CSD कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्याचे आमदार, माजी आमदार, खासदार व भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी लक्ष घालून या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, किसान व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी ‘सांगोला भूषण’ पुरस्काराची घोषणा केली. यासंदर्भातील लिखित पत्र संस्थेस व सुभेदार मेजर रविकांत मराळ यांना देण्यात आले.

कार्यक्रमात सांगलीचे माजी सैनिक मेजर सतीश पाटील व स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्हाईस मॅनेजर सादिक बागवान यांनी मनोगत व्यक्त करून आजी-माजी सैनिकांना मार्गदर्शन केले. अनिल इंगवले व अरविंद केदार यांनीही सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले.

सचिन ज्वेलर्सचे मालक सचिन मिसाळ यांच्या वतीने उपस्थित माजी सैनिकांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व आजी-माजी सैनिक संघटना व मान्यवरांचा आकर्षक ट्रॉफी, शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष मेजर सिद्धेश्वर रामचंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेच्या वतीने उपस्थितांसाठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Translate »
error: Content is protected !!