महाराष्ट्र

देशसेवेचे चोवीस वर्षाचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकवरे यांचा पंढरपुरात भव्य गौरव


सोलापूर प्रतिनिधी संजय निबळकर:
देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात भव्य गौरव!

पंढरपूर : देशासाठी आपल्या आयुष्यातील तब्बल २४ वर्षे ३० दिवस समर्पित करून भारतीय सैन्य दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालेले पंढरपूरचे सुपुत्र हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचे पंढरपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘वर्दीचा सन्मान… तिरंग्याचा अभिमान!’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्याने पंढरपूरचे वातावरण देशभक्तीने भारावून गेले.

दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पंढरपूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भक्ती मार्ग परिसरातून ही रॅली काढण्यात आली. नागरिक, युवक, माजी सैनिक आणि मित्रपरिवार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. **‘भारत माता की जय!’ आणि ‘वंदे मातरम्!’**च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.

यानंतर गाडगेबाबा चौक येथील विराट मंगल कार्यालयात हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा मान्यवर, माजी सैनिक, अधिकारी, नागरिक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला.

२४ वर्षांची गौरवशाली देशसेवा

दि. २ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय सैन्य दलातील ‘कोर ऑफ सिग्नल’मध्ये दाखल झालेल्या विक्रम नाईकनवरे यांनी तब्बल २४ वर्षे देशसेवा केली. सेवाकाळात त्यांनी देशाच्या विविध भागांत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

पंजाबमध्ये अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. तसेच ड्रिल इन्स्ट्रक्टर आणि डब्ल्यू.टी. उस्ताद म्हणून जवानांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. हिमाचल प्रदेश, गोवा, पंजाब यांसह विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहून त्यांनी कर्तव्य बजावले.

विशेष म्हणजे, देशसेवा करत असतानाच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सैन्यात नव्याने दाखल होणारे रिक्रूट, अग्निवीर आणि ज्युनिअर लीडर यांना लष्करी प्रशिक्षण देण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले.

‘प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे’

सत्काराला उत्तर देताना हवालदार विक्रम नाईकनवरे भावूक झाले. आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीच्या आशीर्वादामुळेच देशसेवेचे खडतर कर्तव्य यशस्वीपणे पार पाडता आले, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना देशसेवेकडे वळण्याचे आवाहन केले.
“महाराष्ट्रातील युवकांना माझे आवाहन आणि नम्र विनंती आहे की, प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे. जय हिंद!” असे त्यांनी सांगितले.

देशसेवा बजावत असताना कुटुंबीयांनी दिलेल्या साथीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपण सीमेवर कर्तव्य बजावत असताना नातेवाईक, मित्रमंडळी आणि संपूर्ण परिवाराने आपल्या कुटुंबाची काळजी घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

माजी सैनिक, नागरिकांची मोठी उपस्थिती

या गौरव सोहळ्याचे आयोजन त्यांचे बंधू दीपक राजाराम नाईकनवरे, स्व. राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था, संतपेठ पंढरपूर तसेच पंढरपूर-मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक, अधिकारी, नागरिक आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

देशाच्या सीमेवर तब्बल २४ वर्षे तिरंग्याची शान जपणाऱ्या या वीर सुपुत्राचा पंढरपूरकरांनी केलेला सन्मान हा केवळ एका सैनिकाचा गौरव नसून संपूर्ण सैनिक वर्गाच्या त्यागाला आणि देशसेवेला दिलेली मानवंदना ठरला.

स्नेहभोजनाने या शानदार सोहळ्याची सांगता झाली.


Translate »
error: Content is protected !!