कऱ्हामाई नदीला पूरसदृश प्रवाह, जल पूजन करून ओटी भरत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना! सासवड शहर भाजपा अध्यक्षा सोनाली गिरमे यांचा उपक्रम!!
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवड प्रतिनिधी समीर भिंगारदिवे ::
कऱ्हामाई नदीला पूरसदृश प्रवाह; जलपूजन करून ओटी भरत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना! सासवड शहर भाजपा अध्यक्षा सोनाली गिरमे यांचा उपक्रम!!
सासवड (प्रतिनिधी): पुरंदर तालुक्याची तहान भागवणारी जलदायिनी कऱ्हामाई नदीला पश्चिम पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे आज, मंगळवार (दि. ७ जुलै), पूरसदृश प्रवाह आला. नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरंदर तालुक्यातून वाहणारी कऱ्हामाई नदी पुढे मल्हारसागर धरणात जाऊन बारामती तालुक्याच्या दिशेने प्रवास करते. नदीला पाणी आल्याच्या आनंदात सासवड भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा सोनाली राजेंद्र गिरमे तसेच सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने कऱ्हामाई नदीचे विधिवत जलपूजन करून ओटी भरण्यात आली.
यावेळी बोलताना सोनाली गिरमे म्हणाल्या, “चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. नदीला पाणी आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून आगामी काळात शेतीला मोठा दिलासा मिळेल.”
माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांनी सांगितले की, “पुढील काही दिवसांत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवड शहरात दाखल होणार आहे. नदीत मुबलक पाणी आल्यामुळे वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच शहरातील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे यंदाची वारी अधिक सुखकर होईल, असा विश्वास आहे.”
कऱ्हामाई नदीला आलेल्या पाण्यामुळे शेतकरी, नागरिक आणि वारकरी यांच्यात समाधानाचे वातावरण असून आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी सुटण्यास मदत होणार आहे.






